कोरोना पॉझिटिव्ह महिलेला कोरोना नसल्याचं सांगत पाठवलं घरी; दुसऱ्या दिवशी झाला मृत्यू

Death of a corona positive woman who was sent home without being admitted by the govt covid hospital

धुळ्यातील कुसुंबा येथील एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेला शासकीय कोविड रुग्णालयाने कोरोना नसल्याचं सांगत घरी पाठवलं. त्यानंतर काही तासांनी त्या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला आधी महापालिकेच्या आयटीआय येथील केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने शासकीय कोविड रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तिथे तिला कोरोना नसल्याचं सांगत घरी पाठवलं. परंतु सोमवारी सकाळी या महिलेचा मृत्यू झाला. या महिलोचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली आहे.

कुसुंबा येथील या महिलेला १० सप्टेंबरला त्रास जाणवू लागल्याने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे कोरोना चाचणी करण्यास सांगितलं. कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिला रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आयटीआय येथील कोविड केंद्रात दाखल करण्यात आलं. दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे आयटीआय येथील डॉक्टरांनी संदर्भ पत्र देवून शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तिथल्या डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळी महिला रुग्णाच्या तपासणीचे कुठलेही कागदपत्र न पाहता घशाला संसर्ग असल्याचं सांगितलं. अशक्तपणा असल्याने ग्लुकोजची बिस्किटे खा आणि पाणी प्या, असा सल्ला देत घरी जाण्यास सांगितलं.

दरम्यान, सोमवारी सकाळी घरी महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर काही वेळातच महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह पुन्हा शासकीय कोविड रुग्णालयात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी ११ सप्टेंबर रोजी रुग्णालयात जागा नसल्याने रुग्ण दाखल करून घेतला नसेल, असं उत्तर दिलं. मृत महिलेच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्याकडे कैफियत मांडली. डॉ. रामानंद यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिलं आहे.


हेही वाचा – लस तयार करण्यात भारताची प्रमुख भूमिका; पुरवठा करणं आव्हानात्मक