पिंपरीत १९ व्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

म्हाडा इमारतीचे काम सुरू असताना १९ व्या मजल्यावरून खाली पडल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पिंपरीत घडली आहे.

Pimpari-chinchwad
मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू

म्हाडा इमारतीचे काम सुरू असताना १९ व्या मजल्यावरून खाली पडल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पिंपरीत घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. राजकुमार अशोक घोसले (वय २४, रा. पिंपरी), असं मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर इतर दोघे जण जखमी झाले असून बाबुराव यादव आणि करण यादव अशी त्यांची नावे आहेत. मृत राजकुमार आणि इतर दोन कामगार हे क्रेनवर उभे राहून इमारतीच्या १९ व्या मजल्यावर प्लास्टरचे काम करत होते. तेव्हा क्रेनचे ब्रेक निकामी झाल्याने ते खाली पडले आणि यात राजकुमार यांचा मृत्यू झाला आहे.

या इमारतीतून पडला कामगार

सेफ्टी बेल्ट असतानाही पडला कामगार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमध्ये म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू आहे. मृत राजकुमार आणि दोन कामगार हे क्रेनवर उभे राहून सेफ्टी बेल्ट वापरून १८ आणि १९ व्या मजल्यावर प्लास्टरचे काम करत होते. तेव्हा अचानक उभ्या असलेल्या क्रेनचे ब्रेक निकामी झाले आणि कामगार थेट खाली पडले. यात राजकुमार हा गंभीर जखमी झाला त्याला तातडीने महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर बाबुराव यादव आणि करण यादव हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सेफ्टी बेल्ट असतानाही कामगार खाली पडलेच कसे, असा प्रश्न निर्माण होत असून घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राजकुमार हा मूळचा छत्तीसगड येथील आहे. तो पिंपरी-चिंचवडमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आला होता. परंतु त्याचा १९ व्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाला आहे.

हेही वाचा –

मुख्यमंत्र्यांसोबत पूजा? असं काहीही नाही! – उद्धव ठाकरे

मुंबईत नाल्यात वाहून गेला चिमुरडा!