घरमहाराष्ट्रवेळेत उपचार न मिळाल्याने माता व बालकाचा मृत्यू

वेळेत उपचार न मिळाल्याने माता व बालकाचा मृत्यू

Subscribe

मोखाड्यातील अतिदुर्गम आमले येथील मनिषा सन्या दोरे (25) या गरोदर आदिवासी महिलेस प्रसूतीच्या वेदना काळात रुग्णवाहिका आणि उपचार वेळेत मिळाले नाहीत. त्यामुळे मनिषाचा नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी मृत्यू झाला. मनिषा सूर्यमाळ ग्रामपंचायतीची सदस्याही होती.

सात महिन्यांची गरोदर असलेल्या मनिषाला 17 नोव्हेंबरला अचानक रक्तस्त्राव सुरू होऊन प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. गावातील आशासेविका मंगला वारे हिने 108 रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, रुग्णवाहिका अडीच तासानंतर गावाच्या वेशीवर पोहोचली. दरम्यानच्या काळात येथील ग्रामस्थांनी मनिषाला डोली करून तीन किलोमीटरची पायपीट करत खोडाळा-वाडा या मुख्य रस्त्यावर आणले. या दरम्यान मनिषाच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव आणि पाणी बाहेर पडले.

- Advertisement -

अशा अवस्थेतच खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून, पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. येथे त्याच रात्री मनिषाचे सिजरींग करण्यात आले. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, त्याच रात्री त्या बाळाचा मृत्यू झाला आणि मनिषा अत्यवस्थ झाली. त्यानंतर गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास मनिषाचा मृत्यू झाला. मनिषा सुर्यमाळ- केवनाळा – आमले ग्रामपंचायतीची सदस्या होती. जर वेळेवर उपचार मिळाले असते मनिषा आणि बाळाचे जीव वाचले असते, असा आरोप मनिषाचे पती सन्या दोरे यांनी केला आहे.

या महिलेला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी प्रथमोपचार केले. तिचा रक्तदाब कमी झाल्याने तसेच रक्तस्राव होत असल्याने तातडीने नाशिकला हलवण्यात आले होते. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली 108 रुग्णवाहिका कोविड सेंटरला दिली आहे. तर मोखाड्याची 108 नादुरुस्त आहे. आम्ही 108 ची अनेकदा मागणी केली आहे.
— डा. सागर मुकणे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खोडाळा.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -