कोरोनाग्रस्तांसाठी नागपुरात विकेंद्रीत पद्धतीने कोविड सेंटर्स उभारावे; फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आता नागपुरात लवकरच विकेंद्रीत पद्धतीने किमान १००० खाटा उपलब्ध होणार

प्रातिनिधीक फोटो

कोरोना रूग्णांसाठी नागपुरात विकेंद्रीत पद्धतीने कोविड सेंटर्स उभारण्यात यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून, त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीच्या निमित्ताने आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. या बैठकीनंतर नागपूरसंदर्भात त्यांनी ही मागणी केली. नागपुरात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे रूग्णालयांमध्ये खाटांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे तातडीने कोविड सेंटर्सची उभारणी करणे आवश्यक आहे. नागपूर महापालिकेने कोविड सेंटर्ससंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतू त्याला अद्याप मंजुरी प्रदान करण्यात आलेली नाही. तर उच्च न्यायालयाने सुद्धा या स्थितीची दखल घेतली असून, त्यासंदर्भात काही आदेश दिले आहेत.


“प्रशासन संवेदनशील हवं, हा असंवेदनशीलतेचा कळस आहे.”; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

जम्बो सेंटर्स व्यवस्थापनासाठी कठीण असतात. त्याऐवजी विकेंद्रीत पद्धतीने ही कोविड सेंटर्स उभारली तर त्याचे व्यवस्थापन सोपे होते. या सेंटरसाठी तत्काळ आर्थिक मदत सुद्धा देण्यात यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी तत्काळ राज्याच्या मुख्य सचिवांना यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता नागपुरात लवकरच विकेंद्रीत पद्धतीने किमान १००० खाटा उपलब्ध होणार आहेत.