मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांत निर्णय

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण न टिकल्याने राज्यात मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज नाराज झाल्याने खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने बुधवारी यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. सरकार दोन दिवसांत यावर निर्णय घेणार असून विधी तज्ज्ञ यांच्या मदतीने पुन्हा कोर्टाचे दार ठोठावण्याचा मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

सह्याद्री येथील सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी यावर प्रकाश टाकताना मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी सरकारसोबत विरोधी पक्ष एकत्र असल्याचा खास उल्लेख केला. ‘कायदेशीर बाबींसाठी विधी तज्ज्ञ यांची मदत घेतली जाईल. त्यांच्या सल्ल्यानंतर पुन्हा एकदा कोर्टात दाद मागण्यात येईल. हायकोर्टात मराठा आरक्षणाला विजय मिळवून देणारी विधी तज्ज्ञ यांची टीम पुन्हा एकदा मदतीला घेऊन कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी पुढची लढाई लढली जाईल. ही लढाई कधी करायची आणि मराठा समाजाच्या तरुणांच्या नोकर्‍या आणि शिक्षणात आरक्षण कसे टिकून राहील, यासाठी पावले उचलली जातील’, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. आता आरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेली समिती विविध लोकांबरोबर चर्चा करत आहे. याचवेळी सर्व विरोधी पक्ष सरकारच्या सोबत असल्याने यातून नक्की निघेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आघाडी सरकार ऐकणारे
महाविकास आघाडी सरकार हे लोकांचे प्रश्न ऐकणारे सरकार आहे. सरकार ऐकत नाही तेव्हा आंदोलन करायचे असते. आम्ही सुद्धा आंदोलन करणारे आहोत. हे सरकार मराठा समाजाच्या सोबत असल्याने त्यामधून नक्की मार्ग निघेल, असे ठाकरे म्हणाले.