घरमहाराष्ट्ररस्त्यांची निकृष्ट कामे करणार्‍या ठेकेदारांकडे दक्षता पथकाचे दुर्लक्ष

रस्त्यांची निकृष्ट कामे करणार्‍या ठेकेदारांकडे दक्षता पथकाचे दुर्लक्ष

Subscribe

कामांची बिले पावसाळ्यानंतर द्यावी, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

तालुक्यातील अनेक रस्त्यांची डांबरीकरणाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहेत. त्या सर्व रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याबद्दल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे त्या रस्त्यांची आणि अन्य कामांची बिले शासनाने पावसाळ्यानंतर अदा करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भरत भगत यांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन विभागांकडून आणि आदिवासी विकास विभागाच्या निधीमधून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे केली जात आहेत. कर्जत-चौक, कर्जत-नेरळ-डोणे, तसेच कोंडीवडे-कर्जत-जांभिवली-कडाव-चिंचवली, नेरळ-कळंब, कशेळे-नेरळ, कशेळे-खांडस गणपती घाट, कळंब-पाषाणे, पोशीर-माले अशा काही महत्त्वाच्या रस्त्यांची आणि गावे जोडणार्‍या रस्त्यांची कामे सुरू आहेत.

रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करताना दर्जा राखला जात नाही, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. खांडस भागातील अंभेरपाडा, गणपती घाट-कशेळे, जांभिवली, कोंडीवडे आदी रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची आणि डांबर कमी प्रमाणात वापरून केली जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्या सर्व कामांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता पथकाकडून पाहणी करण्याची मागणी खुद्द बांधकाम विभागाने केली होती. मात्र सर्व काही ठरवून केल्याप्रमाणे पाहणी दौर्‍यावर आलेल्या दक्षता पथकाने जानेवारी महिन्यात येऊन पाहणी केली आणि सर्व कामे दर्जेदार असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले.

- Advertisement -

याबाबत भगत यांनी जोरदार आवाज उठविला आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोकण भवन येथे बसणारे अधीक्षक अभियंता यांना पत्र देऊन कर्जत तालुक्यात बांधकाम विभागाच्या माध्यमातून झालेली कामे चांगल्या दर्जाची व्हावी यासाठी सर्व कामांची देयके पावसाळ्यानंतर देण्याची मागणी केली आहे. आमचा शासनाच्या दक्षता आणि गुण नियंत्रक पथकावर विश्वास नाही. आमचा पावसावर विश्वास असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात तालुक्यातील कामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या दक्षता आणि गुणनियंत्रक पथकाने तालुक्यातून लहान-लहान कामांची पाहणी केली, त्यावेळी मात्र त्यांनी कोणत्याही मोठ्या कामांची पाहणी रस्त्यावर जाऊन केली नाही. याचा अर्थ मोठ्या ठेकेदारांना वाचविण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. कामे चांगली झाली असतील तर ते एक पावसाळा झाल्यानंतर सिद्ध होईल आणि खराब झाली असतील तर ते देखील पावसाळ्यानंतर लगेच समजून येईल.

सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार झाली नाहीत, असा दावा भगत यांनी केला आहे. चांगली कामे झाली आहेत की नाही, हे एक पावसाळा झाल्यावर सिद्ध होऊ शकते आणि त्यावेळी त्यासाठी दक्षता पथकाची गरज भासणार नाही. त्यामुळे हे सिद्ध होइपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही कामांची बिले अदा करू नयेत, अशी भगत यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचा दावा आरडे येथील सामाजिक कार्यकर्ते देवराम धनवटे यांनीदेखील केला आहे.

- Advertisement -

कळंब-नेरळ रस्त्यावर चार कोटी रुपये मंजूर आहेत. त्या रस्त्याचे पोशीर भागात झालेले काम हे प्रवास करताना आपण होडीतून प्रवास करतोय काय, याचा अनुभव आता रस्ता झाल्यापासून यायला लागला आहे.                  – भगत भगत, सामाजिक कार्यकर्ते

कळंब-पाषाणे रस्त्यावर सव्वा चार कोटी रुपये खर्च झाले, मात्र एवढ्या मोठ्या रकमेत रस्ता पूर्ण बनू शकत नाही ही खेदाची बाब आहे. आजही आम्ही दहा वर्षांपूर्वीसारख्या रस्त्याने प्रवास करीत असल्याचा भास होत आहे.         – देवराम धनवटे, सामाजिक कार्यकर्ते

गावाला जोडणार्‍या रस्त्यांवर पुन्हा पाच-सात वर्षे निधी खर्च होत नाही हे लक्षात घेता बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून चांगली कामे करून घ्यायला हवीत, मात्र ठेकेदाराच्या भरवशावर अधिकारी कामांवर फिरकत नाहीत, हे असे किती वर्षे चालणार? – श्रीकांत हाबळे, तंटामुक्त गाव मोहीम अध्यक्ष, पोशीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -