घरमहाराष्ट्रगौरीच्या ओवशांसाठी बांबूच्या सुपांना मागणी

गौरीच्या ओवशांसाठी बांबूच्या सुपांना मागणी

Subscribe

बुरुड व्यावसायिकांना सुगीचे दिवस

गौरी-गणपतीचा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो व या काळात सुपांना मोठी मागणी असते. सध्या अशी सुपे बाजारात व दारोदारी विक्रीसाठी येत असून, त्यामुळे काहीशा अडगळीत गेलेल्या बुरुड समाजाच्या व्यवसायाला यानिमित्ताने सुगीचे दिवस आले आहेत.

तालुक्यातील चोळई येथील अनेक महिला आजही बांबूचा व्यवसाय सामाजिक ओळख म्हणून करीत आहेत. गौरी गणपतीसाठी सुहासिनींना गौरीचे ओवसे घेऊन जाण्यासाठी लागणारी बांबूपासून बनविलेली सुपे येथून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी अन्यत्र जात असतात. नवविवाहित वधूला पाच सुपे पुजावी लागत असल्याने विविध प्रकारची सुपे उपलब्ध आहेत. काही ठिकाणी पारंपरिक सुपे बनविण्यासाठी महिला युद्धपातळी काम करीत आहेत.

- Advertisement -

बुरुड व्यावसायिक बांबूपासून सुपे, टोपल्या, खुराडी, पाट्या बनविणे हे कलाकुसरीचे काम करत असतात. कारागिरांच्या कौशल्याची झलक यामध्ये पाहायला मिळते. पूर्वी या व्यवसायाला खूप मागणी होती, पण कालौघात हा व्यवसाय शेवटच्या घटका मोजतोय. सध्या बुरुड व्यावसायिकाची अवस्था हद्दपार झाल्यासारखी असून, सणासुदीच्या दिवसातच या व्यवसायाला काहीशी झळाळी येते. मुळात या व्यवसायात जेवढी मेहनत आहे त्या तुलनेत फायदा खूपच कमी आहे. एक बांबू ६५ ते ७० रुपयांना मिळतो व त्याच्या पात्या करण्याचे काम जोखमीचे असते. काम करत असताना पातीची किंवा कोयत्याची धार लागून हाताला जखमा होतात पण काम करावेच लागते. मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी यामुळे नवीन पिढी या व्यवसायात उतरायला तयार नाही.

शासनाने कुटिरोद्योग म्हणून यासाठी कर्ज, अनुदानाच्या योजना जाहीर केल्या. काहींनी या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमवताना होणार्‍या दमछाकीमुळे कुणी फारसे या फंदात पडत नाही. शासनाने बुरूड व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबरच सहजरीत्या कर्ज, अनुदान उपलब्ध करून दिले तरच नवउद्योजक या व्यवसायाकडे वळतील, अन्यथा नवी पिढी या व्यवसायाकडे वळणार नाही व हा व्यवसायच संपुष्टात येईल. जीवन पद्धतीत बदल होत गेल्याने पारंपरिक व्यवसाय हद्दपार होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -