कुंचल्यातून वारकरी संप्रदाय उलगडणार्‍या चित्रांचे प्रदर्शन

कलाशिक्षक वेदपाठक यांनी चितारली चित्रे, शुभराय आर्ट गॅलरीत मंगळवारपासून खुले

Mumbai
exhibition

विठुनामाचा गजर करीत भूवैकुंठी पंढरीत येणार्‍या शेकडो दिंड्या, लाखो वारकरी यांचा प्रवास चित्रातून उलगडण्याचा प्रयत्न येथील कलाशिक्षक श्रीकांत वेदपाठक यांनी केला. शुभराय आर्ट गॅलरीत मंगळवार (ता. २०)पासून त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. तीन दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील.मंगळवारी सकाळी अकरा वाजता शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. माजी महापौर महेश कोठे, चित्रकार आणि ‘हास्यकल्लोळ’कार दीपक देशपांडे, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, वारकरी संघटनेचे अध्यक्ष हभप सुधाकर महाराज इंगळे, विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक महेश धाराशिवकर, पंढरपूरचे मदन क्षीरसागर, मंदार सोनवणे, अशोक इंदापुरे, सूरज रेवणकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. गुरुवारी (ता. २२) सायंकाळी या प्रदर्शनाचा समारोप होईल.

पंढरीची वारी म्हटली, की वारकर्‍यांची पाऊले पंढरीकडे धावत असतात. विठ्ठलाच्या ओढीने त्यांचे मन आसुसलेले असते. टाळ-मृदंगाच्या गजरात ही मंडळी घर सोडून पंढरीकडे प्रस्थान ठेवतात. ऊन, पावसाची तमा न बाळगता ओठी फक्त विठुनाम असते. ‘भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रं-दिवस वाट तुझी।’ ही ओढ मनात कायम असते. विठुरायाच्या दर्शनानेच मन तृप्त होते. वैष्णवांच्या या मेळ्यात अनेक रोमांचकारी प्रसंग येतात. गोल अन् उभे रिंगणाच्या निमित्ताने भक्तीला उधाण येते. वारकरी पाताका घेऊन माऊलीचे अश्व सुसाट सुटते. त्यानंतर पंढरीच्या भूमीतच तुकोबा, ज्ञानोबांच्या पालख्यांची भेट होते. दुसरीकडून शेगावीचा राणा गजानन महाराजांची पालखीही येते अन् भूवैकुंठी पंढरी वारकर्‍यांनी फुलून जाते. हेच चित्र श्री. वेदपाठक यांनी कुंचल्यातून साकारले आहे.

वेदपाठक वाखरीचे

श्री. वेदपाठक मूळचे सोलापूरचे. शिक्षकी पेशाच्या निमित्ताने ते पंढरपूरकर झाले. वाखरी येथील माध्यमिक आश्रमशाळेत ते कलाशिक्षक आहेत. त्यांचे शालेय, माध्यमिक शिक्षण सोलापुरातच झाले. कला, व्यवसाय केंद्रातून कलाशिक्षकाची पदवी मिळवली. त्यानंतर ही कला शिकवण्यासाठी शिक्षकी पेशा स्वीकारला. वाखरीस्थित शाळेत असल्याने वारकर्‍यांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले. वाखरीच्या रिंगण सोहळ्याचे वर्णन त्यांनी कुंचल्यातून केले. त्यांचे कुटुंबही वारकरी संप्रदायातील असल्याने या चित्रांचा अवघा रंग एकची झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here