घरमहाराष्ट्र२०१८ डेंग्यू, मलेरियाचं, राज्यात सर्वाधिक मृत्यू

२०१८ डेंग्यू, मलेरियाचं, राज्यात सर्वाधिक मृत्यू

Subscribe

नीती आयोगाने मागणी केल्यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने लोकसभेमध्ये राज्यातली आरोग्यविषयक आकडेवारी मांडली. यामध्ये राज्यातली डेंग्यू आणि मलेरियासंदर्भातली धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

निवडणुका जवळ येताच सरकारकडून गेल्या ५ वर्षांत आपण काय केलं? याचा पाढा वाचायला सुरुवात होते. पण, राज्याच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र हेच सरकार कमी पडलं असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात असंसर्गजन्य आजार म्हणजेच मलेरिया, डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढल्याची बाब एका आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे आणि राज्यासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. निती आयोगाने लोकसभेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मागवलेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

काय आहे या माहितीमध्ये?

या माहितीनुसार,२०१८ या वर्षात राज्यात मलेरिया आणि डेंग्यूमुळे सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. या एकाच वर्षात राज्यात डेंग्यूमुळे ४६ तर, मलेरियामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. इतर राज्यांशी तुलना करता हे प्रमाण खूप जास्त आहे. या आकडेवारीमध्ये मलेरियामुळे ६ मृत्यू झालेलं पश्चिम बंगाल आणि डेंग्यूमुळे ३७ मृत्यू झालेलं केरळ महाराष्ट्राच्या खालोखाल आहे.

- Advertisement -

Death Chart

गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०१६ मध्ये मलेरियाच्या २ हजार ९८३ केसेसची नोंद करण्यात आली होती. २०१७ मध्ये १७ हजार ७१० आणि गेल्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये ९ हजार ३२२ केसेसची नोंद करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रात १० जणांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल या राज्यात एकूण ६ जण मलेरियामुळे दगावले आणि ओडिशात ४ जणांना जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात ओडिशाहून गंभीर परिस्थिती

तसंच, महाराष्ट्रात गेल्या वर्षी मलेरियाच्या एकूण ९ हजार ३२२ केसेसची नोंद करण्यात आली होती. या तुलनेत ओडिशा राज्यात सर्वात जास्त मलेरिया केसेस आढळले होते. ओडीशात एकूण मलेरियाचे ५९ हजार ७६९ केसेसची नोंद करण्यात आली आहे आणि एकूण ४ मृत्यू झाले होते. त्यामुळे, महाराष्ट्रात मलेरियाच्या केसेस जरी कमी झाल्या असल्या तरी मलेरियामुळे मृत्यूंचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे.

Dangue Cases Chart

ओडिशामध्ये तब्बल ५९ हजाराहून अधिक मलेरियाचे रुग्ण आढळून देखील मृत्यू फक्त ४ आहेत. त्यामुळे रुग्णांना चांगले उपचार पुरवण्यात ओडिशा राज्यात महाराष्ट्रापेक्षा चांगली परिस्थिती आहे असंच म्हणावं लागेल.


तुम्हाला हे माहिती आहे का? – दररोज ३ जणांना होते डेंग्यूचे लागण!


डेंग्यूमुळे मृत्यूंचं प्रमाणही जास्त

राज्यात गेल्यावर्षी ४६ जणांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला आहे. तसंच, ९ हजार ४५१ डेंग्यू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जास्त आहे. २०१७ मध्ये एकूण ७ हजार ८२९ रुग्णांची नोंद करण्यात आली होती आणि ६५ जणांचा मृत्यू झाला होता. तसंच, पंजाबमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त रुग्ण आढळले असून १३ हजार ७५० डेंग्यू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे आणि एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे, महाराष्ट्रात जरी मलेरिया आणि इतर असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरीही या आजारांमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण राज्यात सर्वात जास्त आहे. त्याखालोखाल केरळमध्ये ३७ मृत्यू झाले आहेत. असे एकूण भारतात २०१८ या वर्षी डेंग्यूमुळे तब्बल १४४ मृत्यू झाले आहेत.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -