खारफुटीच्या ५ हजार ५५५ झाडांचा बळी !

Mumbai

सिडकोचा औद्योगिक पट्टा (कंटेनर गोदामे) म्हणून ओळख असणार्‍या द्रोणागिरी सेक्टर 1 मधील एका मोकळ्या प्लॉटमधील सुमारे 5 हजार 555 झाडे जाणूनबुजून मारण्यात आली आहेत. त्यामुळे कधीकाळी हिरवागार दिसणारा हा प्लॉट आता सुकलेल्या झाडांमुळे विद्रुप दिसू लागला आहे. एपीएम टर्मिनलच्या आणि गुप्ता वजन काट्याच्या समोरचा हा मोकळा प्लॉट आहे. मोठ्या प्रमाणात खारफुटी असल्यामुळे या प्लॉटवर भराव करण्यात आला नव्हता.जेएनपीटी, सिडको आणि एनएचएआय यांच्या सुरू असलेल्या कामांमुळे खारफुटी मृत झाली असल्याचे पर्यावरण प्रेमी सांगतात.

रस्ते आणि इतर कामांसाठी या जागेत येणारे खाडीचे पाणी बंद केल्याने ही खारफुटी करपून गेली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे आणि सागरी जैव विविधतेचे न भरून येणारे नुकसान झाले असल्याची खंत पक्षी आणि पर्यावरण प्रेमी निकेतन ठाकूर यांनी व्यक्त केली. तालुक्यात सिडको आणि जेएनपीटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत. यासाठी समुद्र किनारा आणि खाडी किनार्‍यावर भराव केला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात खारफुटीची झाडे नष्ट केली जातात.

जेएनपीटीचे चौथे बंदर, एनएसआयजीटी यासाठी तर शेकडो हेक्टर जमिनीवरील खारफुटी तोडण्यात आली होती. करंजा टर्मिनलसाठीदेखील मोठ्या प्रमाणात खारफुटी तोडण्यात आली आहे. इतर खाडी किनार्‍यावर राजरोसपणे खारफुटीची कत्तल केली जात असताना वन विभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांनी मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. यामुळे ठिकठिकाणी पर्यावरणाचा खुलेआम र्‍हास सुरू आहे. द्रोणागिरी परिसरातील सिमेंटच्या जंगलात हिरवाई टिकवून ठेवणार्‍या या एकमेव जागेवरील खारफुटी जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आली आहे.

याबाबत वन अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर तहसीलदार कल्पना गोडे यांच्याकडे विचारणा केली असता एनएच 4 ब या रस्त्याचे काम सुरू होते त्यावेळी या झाडांना पाणी न मिळाल्यामुळे ती सुकली आहेत. त्याचे पंचनामे केले असल्याचे सांगितले. सुकलेली झाडे 5 हजार 555 इतकी आहेत. सिडको, जेएनपीटी आणि एनएचएआय यांना येथे पुन्हा झाडे लावण्यास सांगितली आहेत. आतापर्यंत 500 झाडांसह 5 हजार बिया या परिसरात टाकण्यात आल्या असल्याचे त्या म्हणाल्या.