घरमहाराष्ट्रसरकारला अ‍ॅक्शन पॅरेलेसिसही झालेला

सरकारला अ‍ॅक्शन पॅरेलेसिसही झालेला

Subscribe

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

तीन पक्षांच्या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तीन पक्षांचा एकमेकांमध्ये समन्वय नाही. तसेच या तीन पक्षांचा अधिकार्‍यांशीही समन्वय नाही. त्यामुळे ठाकरे सरकारला पॉलिसी पॅरेलेसिस तर झाला आहेच पण या सरकारला अ‍ॅक्शन पॅरेलेसिसही झाला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शिवसेना केंद्र सरकारवर करत असलेल्या टीकेला अर्थ नाही, तत्त्व नाही आणि मूल्यही नाही. असेही ते म्हणाले.

केंद्राने घाईनेच लॉकडाऊन केला, अशी टीका शिवसेनेकडून होते. मात्र, शिवसेनेच्या टीकेला अर्थ नसल्याचे उत्तर फडणवीस यांनी दिले. देशाच्या आधी लॉकडाऊन पुकारला तो महाराष्ट्राने. मग लॉकडाऊनची घाई कुणी केली? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.देश आम्हाला फॉलो करतो आहे अशा जाहिराती तेव्हा केल्या आणि आता यांना त्याचा विसर पडला, त्यामुळे केंद्राने लॉकडाऊन करताना घाई केली अशी ओरड केली जात असल्याचे ते फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

सत्तेत असतानाही शिवसेना विरोधी पक्षात असल्यासारखी होती

शिवसेना भाजपसोबत पाच वर्षे सत्तेत होती. मात्र, तेव्हाही त्यांनी विरोधी पक्षाचेच काम केल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच शिवसेना एका भूमिकेवर ठाम राहिली असती तर ठीक होते, पण रोज भूमिका बदलायची हे त्यांचे धोरण असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. एक दिवस म्हणायचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. काही दिवसांनी मोदींवर टीका करायची. एकदा राज्यपालांना नावे ठेवायची, नंतर कुर्निसात करायचा. फक्त टीकेसाठी टीका करायची, असे शिवसेनेचे धोरण असल्याचे फडणवीस म्हणाले.

रायगडला दिलेली मदत तोकडी

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल असे सांगत या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. एवढेच नाही तर राज्यात भाजपाचे सरकार असताना अशा आपत्तीच्या प्रसंगात कसे निर्णय घेण्यात आले. नागरिकांना कशी जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून दिली त्याची उदहारणे देखील फडणवीस यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

राज्यात करोनाची स्थिती वाईट होत चालली आहे, असे म्हणत जेवढ्या चाचण्या व्हायला हव्यात तेवढ्या होत नसल्याचे सांगत माजी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड ताब्यात घेतले आहेत याही फक्त घोषणा असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तसेच श्रमिक जेव्हा ट्रेन सुरू केल्या गेल्या नव्हत्या आणि पायी चालले होते तेव्हा आपल्या डोक्यावरचे संकट टाळायचे हे या सरकारचं धोरण होतं. श्रमिकांची काळजी त्यावेळी घेतली गेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीतही मी त्यांना सल्ला दिला होता की जे पायी जाणारे श्रमिक आहेत त्यांना थांबवा, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -