देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार!

devendra-fadnavis
देवेंद्र फडणवीस

विद्यमान १३ व्या विधानसभेचा कालावधी ९ नोव्हेंबरला संपुष्टात येत असल्याने तांत्रिक बाब म्हणून विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. ८नोव्हेंबरला दिवसअखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांना राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करावा लागणार आहे.

सामान्यत: मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा समजला जातो. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वातच नव्या मंत्रीमंडळाच्या नेमणुका होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता कायदेशीर आणि घटनात्मक बाबींच्या अनुषंगानेही गुरुवारी दिवसभरात काही घडामोडी घडल्या. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांची भेट घेतली. अद्याप सत्तास्थापनेचा दावा कुणाकडूनही न आल्यामुळे संभाव्य परिस्थितीवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री!
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची की मावळत्या मुख्यमंत्र्यांकडेच सरकार स्थापनेचा प्रस्ताव येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी द्यायची? हा निर्णय आता राज्यपालांचा असणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा कालावधी संपला, तरीही त्यांच्याकडेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.