आपल्याला कोरोनाशी लढायचे आहे कंगनाशी नाही, हे सरकार विसरलेय

devendra fadnavis
देवेंद्र फडवणीस यांची राज्य सरकारवर टीका

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. या वादावरून अख्खी सरकारी यंत्रणा कंगनाशी लढण्यासाठी उतरली आहे. आता कोरोनाशी लढणे संपले असून कंगनाशी लढाई सुरू आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस शुक्रवारी राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आता कोरोनाशी लढणे संपले असून कंगनाशी लढाई सुरू आहे. या प्रकरणात जी काही चौकशी करायची ती करावी. कंगनानेही तसे सांगितले आहे. मात्र, कुठंतरी गांभीर्याने कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. याचबरोबर, जेवढ्या तप्तरतेने कंगनाची चौकशी करू, हे करू ते करू म्हणत आहात, त्यापेक्षा जास्त लक्ष कोरोनाकडे द्यायची गरज आहे. त्यापेक्षा 50 टक्के तरी क्षमता कोरोनावर खर्च करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कमी पडले
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कमी पडले असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ही स्थगिती तीन न्यायाधीशांच्या समितीने दिली आहे. आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून जोवर स्थगिती उठविली जात नाही, तोवर स्थगिती कायम राहील. प्रचंड स्टॅटर्जी तयार करून कोर्टात जावे लागते. आम्ही तसे सतर्क राहायचो. मराठा समाजाच्या सगळ्या संघटनांनी सांगितले की, राज्य सरकार कमी पडत आहे. हा माझ्याकरता राजकारणाचा मुद्दा नाही. आपण यात मार्ग काढला पाहिजे, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण कसे मिळेल, हे पहायला हवे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी घरची धुणी रस्त्यावर धुत नाही
एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत, पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही, त्यांना एमआयडीसी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मी घरची धुणी रस्त्यावर धुत नाही. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लीन चिट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनामा द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.