आमदारांचे लिंबू आणि मुख्यमंत्र्यांचे गाजर; आता बांधलेच पाहिजेत – मुंडे

Beed
Dhananjay Munde
धनंजय मुंडे

विधानसभा निवडणुकाचा ज्वर राज्यात चढू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे, धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांनी सेना-भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सध्या शिवस्वराज्य यात्रा मराठवाड्यात असून मुंडे कुटुंबियांचा बालेकिल्ला असेल्या बीडच्या गेवराई मतदारसंघामध्ये यात्रेची जाहीर सभा रविवारी झाली. या सभेमध्ये तिन्ही स्टार प्रचारकांनी सत्ताधारी पक्षांवर तोफ डागली. यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी भाजपवर हल्ला चढवला. ‘भगव्याला हात लावू नका असं तुम्ही आम्हाला सांगताय. पण इथल्या महापुरुषांच्या फोटोंना हात लावण्याची तुमची लायकी नाही’, असं मुंडे म्हणाले. तसेच, ‘इथल्या आमदारांचे लिंबू आणि मुख्यमंत्र्यांचे गाजर आता गाडीला बांधण्याची गरज आहे’, असा टोला देखील यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.

‘होऊन जाऊ दे दूध का दूध…’

‘गाडीला जसं लिंबू-मिरची बांधली जाते, तसे इथल्या आमदाराचे लिंबू आणि मुख्यमंत्र्यांचे गाजर गाडीला बांधण्याची गरज आहे. आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांचे गाजर माहीत होतं. पण आमदाराचे लिंबू पहिल्यांदा ऐकायला मिळालं. त्यामुळे आता हे गाजर-लिंबू बांधायलाच हवेत’, असं यावेळी मुंडे म्हणाले. तसेच, ‘शिवस्वराज्य यात्रेला भ्रष्टाचारी यात्रा म्हणता, मी आरोप केलेल्या मंत्र्यांचे पुरावे देतो, या एकाच व्यासपीठावर दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ दे’, असं जाहीर आव्हानच मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं.


हेही वाचा – कुठे गेला कृत्रिम पाऊस; सरकारने मराठवाड्याला फसवलं – मुंडे

देवेंद्र आणि नरेंद्र यांच्यामुळे भवितव्य चांगलं नाही – जयंत पाटील

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘सगळी जनता बॅलेट पेपरची मागणी करत असताना भाजपलाच असं मतदान नको आहे. आपलं भवितव्य आपणच ठरवायचं आहे. देवेंद्र आणि नरेंद्र यांच्यामुळे आपलं भवितव्य चांगलं नाही’, असं ते म्हणाले. ‘बेकारी कशी असते, मंदी कशी असते हे आज पहायला मिळत आहे. जेटमध्ये लाखो लोक बेकार झाले आहेत. नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. गाड्या तयार करणारे कारखाने बंद होत आहेत. सहा लाख कंपन्या बंद पडल्या आहेत. मागणी नाही पुरवठा करणारी यंत्रणा नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत खेळ सुरु आहे’, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.