१९ नोव्हेंबर अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार

आमदार अनिल गोटे यांनी धुळ्याच्या महापौरपदावर दावा ठोकला होता. अखेर आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. १९ तारखेला अनिल गोटे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे.

Dhule
BJP MLA Anil Gote screwed BJP rally in Dhule
भाजपचे आमदार अनिल गोटे

धुळ्याचे भाजपचे आमदार अनिल गोटे आमदारकीचा राजीनामाम देणार आहेत त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. अनिल गोटे यांनी येत्या १९ नोव्हेंबरला आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. धुळ्यामध्ये महापौरपदावर अनिल गोटे यांनी दावा केला आहे. धुळ्यातील शिवतीर्थ चौकातील जाहीर सभेमध्ये स्वत: अनिल गोटे यांनी महापौर पदाची निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली होती. धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवल्यामुळे अनिल गोटे नाराज झाले आहेत.

मेळाव्याचे निमंत्रण न दिल्याने नाराज

धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये भाजपतर्फे विजय संकल्प कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजप आमदार अनिल गोटे यांना या मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आलेले नव्हते त्यामुळे गोटे नाराज झाले होते. अनिल गोटे यांना डावलून धुळे पालिका निवडणुकीचे सर्वाधिकार गिरीश महाजन यांना दिल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार गोटे यांनी भाजपने आयोजित केलेला मेळावा उधळून लावला.

भाजपचा मेळाव्यात राडा

आमदार गोटे हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन भाषणासाठी उभे राहिल्यावर सभेच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांसोबत आले. महापालिका निवडणुकींपासून दूर ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या गोटे यांनी थेट मंचावर जात रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्याकडून माईक हिसकावून घेत, सभेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे महाजन आणि दानवे यांचे समर्थक आणि आमदार गोटे यांच्यात बाचाबाची झाली होती. दरम्यान अनिल गोटे यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. हा वाद चांगलाच वाढला आणि खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली.

१९ तारखेला राजीनामा देणार

या घटनेनंतर आमदार अनिल गोटे यांनी धुळ्याच्या महापौरपदावर दावा ठोकला. अखेर आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. १९ तारखेला अनिल गोटे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. मात्र भाजप अनिल गोटे यांचा राजीनामा स्विकारणार की नाही हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.