घरलोकसभा २०१९खडाजंगीउदयनराजेंच्या मतदारसंघात नरेंद्र पाटील होणार का 'जायंट किलर'?

उदयनराजेंच्या मतदारसंघात नरेंद्र पाटील होणार का ‘जायंट किलर’?

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असलेले खासदार उदयनराजे भोसले यंदा तिसऱ्या वेळेस सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यांना लढत देत आहेत, माथाडी कामगारांचे नेते तरुण नरेंद्र पाटील. या महत्त्वाच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सातारा लोकसभा निवडणूकीत यंदा छत्रपतींचे वारसदार उदयनराजे भोसले आणि माथाडी कामगार आणि मराठा महासंघाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे. उदयनराजेंच्या विरोधात आव्हान उभे करणारे नरेंद्र पाटील चर्चेचा विषय ठरले असून राज्यातील मुख्य लढतींमध्ये या मतदारसंघाची गणना आता होऊ लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीत उदयनराजेंसारख्या मातब्बर उमेदवाराला पराभूत करून नरेंद्र पाटील हे ‘जायंट किलर’ठरतील का? हा औत्सुक्याचा विषय बनला आहे.

पाटण तालुक्यातील ढेबेवाडीचे रहिवासी असलेले नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे लोकप्रिय नेते दिवंगत अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी विधानपरिषद आमदार असलेल्या पाटील यांनी अलिकडेच भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद (कॅबिनेट दर्जा) देण्यात आले होते. त्यानंतर दोन महिन्यांपासून सातारा मतदारसंघामधून त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत घेतले आणि सातारा येथून लोकसभेची उमेदवारी दिली.

- Advertisement -

माथाडी कामगारांचे लोकप्रिय नेते

माथाडी कामगारांचे नेते म्हणून नरेंद्र पाटील मुंबई आणि परिसरात लोकप्रिय आहेत. त्यांच्या मूळ पाटण तालुक्यातही त्यांचा चाहता वर्ग बऱ्यापैकी आहे. माथाडी कामगारांसाठी त्यांचे सामाजिक आणि राजकीय काम मोठे आहे. सक्रीय कार्यकर्ते आणि नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे काढून या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील जास्तीत जास्त उदद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यात पुढाकार घेतला होता. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, वाई, या विधानसभा मतदारसंघात मतदार असलेल्या माथाडी कामगारांची संख्या मोठी आहे. याशिवाय सातारा शहरातूनही त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो. पाटण तालुक्यात त्यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांनी बचतगटाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून चांगली मोर्चेबांधणी केली आहे. त्याचाही फायदा यंदा नरेंद्र पाटील यांना होऊ शकतो. मराठा समाजाचे एक नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे वडील अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेले बलिदान आजही लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे भाजपा सेनेकडे वळालेल्या मराठा समाजाची मते त्यांना मिळू शकतात. त्यांची सातारा लोकसभेत ‘कोरी पाटी ‘असणे हे कारणही मतदारांसाठी आकर्षणाचे काम करू शकते.

उदनराजेंविरोधात मतदारांची नाराजी?

नरेंद्र पाटील यांचे प्रतिस्पर्धी असलेले खासदार उदयनराजे भोसले हे तरुणांच्या एका वर्गात लोकप्रिय आहेत. छत्रपतींचे वारसदार असल्यामुळेही त्यांची लोकप्रियता मोठी आहे. मात्र खासदार झाल्यापासून उदयनराजे भोसले यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी ठोस काम केले नसल्याची भावना येथील जनता व्यक्त करत आहेत. संसदेत हजेरी कमी असणे, खासदार निधीचा पुरेसा वापर न करणे, सातारा शहरातील तरुणांच्या रोजगार आणि शिक्षणासाठी ठोस योजना न राबविणे अशा अनेक गोष्टी त्यांच्या नाराजीला कारणीभूत होऊ शकतात. सतत दोनवेळा खासदार झाल्याने यंदा ‘ॲँटी इन्कम्बंसी’चा सामनाही त्यांना करावा लागू शकतो. याशिवाय मागच्या निवडणुकीच्या वेळी उदयनराजेंसमोर कुणीच तगडा उमेदवार नव्हता. त्याचाही फायदा त्यांचा जास्त मतदान मिळण्यात झाला होता. यंदा मात्र शिवसेनेने नरेंद्र पाटील त्यांना उमेदवारी दिल्याने ते उदयनराजेंना चांगली लढत देऊ शकतात अशी स्थिती आहे.

- Advertisement -

स्थानिक आमदारांचीही उदयनराजेंवर नाराजी?

वाई, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण आणि सातारा हे विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतात. यातील पाटण वगळता उर्वरित सर्व मतदारसंघांत कॉँग्रेस (कराड- पृथ्वीराज चव्हाण)आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार आहेत. तर पाटणमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. वरकरणी विधानसभा मतदारसंघांतली ही स्थिती राष्ट्रवादीच्या फायद्याची दिसत असली, तरी त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना कितपत होईल याची शंका आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कॉँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वगळता राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आमदारांमध्ये उदयनराजेंबदद्दल नाराजी आहे. त्यात सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि त्यांचे चुलतबंधू शिवेंद्र राजेंचाही समावेश आहे. मध्यंतरी शरद पवार यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये सलोख्याचे प्रयत्न केले होते. मात्र अलिकडेच शिवसेना-भाजपा युतीचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासोबतच्या जवळीकीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात शिवेंद्रराजे कोणती भूमिका घेतात हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या गोष्टीचा फायदा नरेंद्र पाटील यांना होऊ शकतो.

सातारा मतदारसंघ परंपरेने कॉग्रेसचा

सातारा लोकसभा मतदारसंघ 1952 ते 1996 दरम्यान कॉँग्रेस कडे राहिला. अपवाद दुसऱ्या लोकसभेचा. त्यावेळेस 1957 ते 62 दरम्यान कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि स्वातंत्र्य सैनिक क्रांतिसिंह नाना पाटील खासदार होते. 1996-98 या काळात शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर येथे खासदार होते. त्याच्या पुढील लोकसभेला म्हणजेच 98-99दरम्यान पुन्हा कॉँग्रेसकडून अभयसिंह शाहुमहाराज भोसले खासदार झाले. 1999 पासून हा मतदारसंघ आजतागायत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात आहे. तर 2009 पासून मागील दोन लोकसभा उदयनराजे भोसले तेथून सलग निवडून येत आहेत. 2009 ला पहिल्याच वेळेस 5 लाख 32 हजार म्हणजेच एकूण मतदानाच्या 65.22 टक्के मतदान घेऊन उदयनराजेंनी येथून मोठा विजय मिळविला होता. शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांना 2 लाख 35 हजार म्हणजेच 28 टक्के मते मिळाली होती. ते दुसऱ्या स्थानावर राहिले. उदयनराजेंच्या विजयातील मतांचा फरक तब्बल 3 लाखांचा होता.

2014 मध्ये मतदात्यांमध्ये वाढ झाली आणि सोबत उदयनराजेंच्या विजयाच्या फरकातही वाढ झाली. तब्बल 3 लाख 66 हजार मतांनी ते निवडून आले. मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जास्त असल्याने त्यांची विजयी मतांची टक्केवारी घटून ती 53.50 टक्के राहिली. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी 1 लाख 55 हजार मते मिळवली (सुमारे16 टक्के). तर आम आदमीचे राजेंद्र चोरगे यांनी बऱ्यापैकी लढत देत 82 हजार मते मिळविली. थोडक्यात मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी 53 तर विरोधी उमेदवारांची सर्व मिळून 47 टक्के इतकी होती. यंदा आम आदमी पक्षाने निवडणूक न लढविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्यांच्या मतांची विभागणी टळू शकेल. त्याचा फायदा उदयनराजेंना मिळू शकतो. लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सातारा येथे भाजपा विरोधात सभा घेणार आहे. त्याचाही परिणाम उदयनराजेंच्या मते वाढण्यावर होऊ शकतोे.

येत्या 23 एप्रिल रोजी सायंकाळी सातारा लोकसभा मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांची भवितव्ये एव्हीएम बॉक्समध्ये बंद होतील. त्यानंतर थेट महिनाभरातच म्हणजे 23 मे रोजी समजेल की कोणी बाजी मारली ते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -