दिशाला न्‍याय मिळाला आरोपींचे एन्‍काऊटर

देशभरातून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव, सायराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार आणि आरोपी

Mumbai

हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणी, दिशावर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता एन्काऊंटर करण्यात आला आहे. मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशवुलु अशी या आरोपींची नावे होती. या एन्काऊंटरचे संपूर्ण देशात पडसाद उमटले. पोलिसांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य नागरीक आनंद व्यक्त करत आहेत. मात्र कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ आणि राजकीय पक्षांनी या एन्काऊंटरबद्दल चिंता व्यक्त केली असून अशा घटनांमुळे न्यायव्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास उडेल, असे म्हटले आहे. या एन्काऊंटरमुळे लोकसभा आणि राज्यसभेतही एकच हल्लकल्लोळ माजला.

काँग्रेस आणि भाजपने या एन्काऊंटरचे स्वागत केले. मात्र हैदराबादप्रकरणासारखा उन्नाव प्रकरणातही पिडीतेला न्याय मिळावा, अशी मागणी काँग्रेसने लोकसभेत केली. त्यावर बलात्कारासारख्या प्रकरणाचे राजकारण करू नये, असे भाजपकडून सांगण्यात आले.

पशुवैद्यकीय डॉक्टर दिशावरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकार्‍यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. या प्रकरणाचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्री आरोपींना घटनास्थळी जिथे सामुहिक बलात्कार करण्यात आला तेथे नेले होते, अशी माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त सज्जनार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर घटनास्थळी मध्यरात्री आरोपींनी दोन पोलीस कर्मचार्‍यांच्या बंदुका हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना बंदुका परत देण्यासाठी सांगितले. मात्र, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केलाच. त्यावेळी पोलिसांनी चार आरोपींवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मानव अधिकार आयोग अथवा अन्य सामाजिक संस्थेने याप्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास आम्ही उत्तर देण्यास तयार असल्याचे पोलीस आयुक्त सज्जनार यांनी सांगितले. 30 मिनिटे हा गोळीबार सुरु होता. आम्ही सायंटिफिक पद्धतीने या प्रकरणाची तपासणी करून चारही आरोपींना अटक केली होती.4 आणि 5 डिसेंबरला आरोपींची चौकशी करण्यात आली होती. चारही आरोपींना घटनास्थळी घेऊन गेल्यानंतर आरिफ आणि चिंताकुटा यांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. आरोपींनी दंडुके आणि दगडफेक करत पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोन आरोपींनी गोळ्या देखील झाडल्या.

ही घटना सकाळी 5.45 ते 6.15 या दरम्यान घडली. आरोपींच्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे. यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवले जातील. आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गतही गुन्ह्याची नोंद झाली असल्याची माहिती सज्जनार यांनी दिली. पीडित तरुणीचा फोन घटनास्थळाहून हस्तगतपोलिसांनी घटनास्थळाहून पीडित डॉक्टर तरुणीचा फोन हस्तगत केला आहे. मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशवुलु या चारही आरोपींना घटनाक्रम उलगडण्यासाठी घटनास्थळी घेऊन जाण्यात आले होते. घटनाक्रम जाणून घेणं हा पोलिसांचा उद्देश होता. जेणेकरून या प्रकरणाचा तपास करणे सोपे होईल, असे सज्जनार यांनी सांगितले.

हैदराबाद एन्काऊंटर संसदेत
हैदराबाद एन्काउंटर प्रकरण शुक्रवारी संसदेत गाजले. हैदराबाद एन्काउंटरचे समर्थन करत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने उन्नाव घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. एकीकडे हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना पळून जात असताना गोळी मारून ठार केले जाते, तर दुसरीकडे उन्नाव प्रकरणातील आरोपींना जामीन दिला गेला, असे वक्तव्य लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच एकीकडे देशात राम मंदिर उभारले जात आहे, तर दुसरीकडे सीतामातेला जाळले जात आहे, असेही वक्तव्य चौधरी यांनी केले आहे. रंजन यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार आक्षेप घेतला. महिलांचा सन्मान आणि महिला सुरक्षा या विषयाला जातीय रंग देणे फार वाईट आहे. आज येथे एक खासदार मंदिराचे नाव घेत होते आणि एका खासदारांनी येथे उन्नाव आणि हैदराबादबद्दल मुद्दा उपस्थित केला, परंतु मालदावर मौन बाळगले, असे इराणी म्हणाल्या.

ट्रकमधून नेला होता मृतदेह
तेलंगण पोलिसांना याप्रकरणी चार आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला होता. पोलिसांनी सांगितलं होतं की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.

स्कुटी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घेऊन गेले होते
२७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचे पाहिले होते. यानंतर आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झाले असल्याचे तिने पाहिले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. पीडित तरुणी पंक्चर झाल्यामुळे चिंतेत होती. यावेळी एक आरोपी मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत काही दूर घेऊन गेला. यानंतर पीडित तरुणीवर जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

मानवाधिकार आयोग चौकशी करणार
हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली असून लवकरात लवकर घटनास्थळी जाऊन एन्काऊंटर प्रकरणाचा तपास करावा असे आदेश आयोगाने विशेष तपास पथकाला दिले आहेत. हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एक पथक तयार केले असून या पथकाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नेतृत्व करणार आहेत.

पोक्सो अंतर्गत दयेच्या अर्जाची तरतूद रद्द करावी-राष्ट्रपती
माऊंट आबू (राजस्थान)8बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हेगारांना दयेचा अर्ज करण्याची असलेल्या तरतुदीचा संसदेत पुनर्विचार करून ती मुभा रद्द करायला हवी, असे स्पष्ट मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. महिलांवरील विविध प्रकारचे अत्याचार रोखण्यासाठी समाजमन बदलण्याची गरज आहे. महिलांप्रती आदर आणि सन्मान वाढल्यास अशा अत्याचाराच्या घटना रोखण्यात मोठा हातभार लागेल. महिला सुरक्षेसाठी अनेक पावले उचलण्यात येत असली तरी हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. याबाबतीत आणखी बरंच काम अपेक्षित आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले. ते सिरोह येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

हे एन्काऊंटर कायद्याला धरून नव्हते. मारले गेलेले आरोपी पोलिसांकडील शस्त्र घेऊन पळत होते व त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यात संशयास जागा आहे. -अ‍ॅड. उज्ज्वल निकम, सरकारी वकील.

या एन्काऊंटरने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अशाप्रकारे एन्काऊंटर झाले तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. पुरावे नष्ट होतात. त्यामुळे या एन्काऊंटरची सीबीआय चौकशी व्हायला हवी, असे मला वाटते.
-डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद. आमदार, शिवसेना.