घरमहाराष्ट्रपुण्यात कालवा पोखरणारे उंदीर-घुशी हिवाळी अधिवेशनात!

पुण्यात कालवा पोखरणारे उंदीर-घुशी हिवाळी अधिवेशनात!

Subscribe

काही दिवसांपूर्वी पुण्यात कालवा फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झाली होती. उंदीर-घुशींना कालव्याची भींत पोखरल्यामुळेच ती फुटल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. त्याचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळात दिसून आले.

गेल्या महिन्यात पुण्याच्या खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्याची भिंत फुटल्यामुळे त्याच्या आजूबाजूला राहाणारे अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते. मात्र, ही भिंत उंदीर-घुशींनी पोखरल्यामुळेच फुटल्याचा दावा नंतर करण्यात आला. पण हेच उंदीर-घुशी शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनात पाहायला मिळाले. अर्थात, या मुद्द्यावरून शुक्रवारी विधानभवनात विरोधी पक्ष काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावरून घेरलं. तसेच, कालव्याच्या भिंतींची २५ वर्ष दुरुस्तीच केली नसल्याच्या मुद्द्यावरही काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना सवाल केले. यावर टीका करताना ‘मंत्रालयातले उंदीर एक्स्प्रेसने पुण्याला गेल्यामुळे कालवा फुटला का?’ असा प्रश्न काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांनी करताच सभागृहात हशा पिकला. मात्र, लागलीच विरोधकांनी मूळ मुद्द्यावरून सरकारवर टीका करायला सुरुवात केली.

…म्हणून कालवा फुटला का?

कालवा दुर्घटनेला भिंत फुटणं कारणूभूत होतं आणि भिंत फुटायला त्याखालचे उंदीर-घुशी कारणीभूत होते हे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं होतं. मात्र, त्यावर अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये सरकारला प्रश्न विचारला. मंत्रालयातले उंदीर एक्स्प्रेसने पुण्याला गेले म्हणून पुण्यातला कालवा फुटला का? असा प्रश्न गाडगीळ यांनी विचारला. दरम्यान, यावर उत्तर देताना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी स्पष्टीकरण दिलं. हा कालवा उंदीर आणि घुशींनी पोखरल्यामुळे फुटल्याचे सांगत गेल्या २५ वर्षांत हा कालवा सतत प्रवाहात असल्यामुळे या कालव्याची दुरुस्ती करता आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, दुरुस्ती न केल्यामुळेच उंदीर-घुशींनी तो पोखरल्याचं देखील त्यांनी सभागृहाला सांगितलं.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले राज्य मंत्री?

या कालव्याच्या आजूबाजूला हॉटेलं आणि झोपडपट्टी असल्यामुळे कालव्यात उंदीर आणि घुशींना या हॉटेल आणि झोपड्यांमधून फेकला जाणारा कचरा खाद्य म्हणून मिळत असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. दरम्यान आता १४ ठिकाणी या कालव्याची दुरुस्ती केली असून, यासाठी एक समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल १५ डिसेंबरला येईल, असे देखील विजय शिवतारे यांनी सांगितले. तसेच या अपघातामुळे ७३० कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यातील ९० घरे पूर्णतः बाधित झाली असून, राज्य सरकारच्या वतीने ३ कोटींची मदत करण्यात आली आहे. यातील ३० बाधितांना एसआरएमधून घरे दिली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

२५ वर्ष दुरुस्ती न होणं दुर्दैवी

दरम्यान, हा कालवा सतत प्रवाहात असल्यामुळे त्याची २५ वर्ष दुरुस्तीच झाली नाही या मंत्री महोदयांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या हेमंत टकले यांनी आक्षेप घेतला. ‘आज नवीन तंत्रज्ञान आलं आहे. बाहेरच्या देशांमध्ये त्याचा वापर केला जातो. मग २५ वर्ष इथे दुरुस्ती झाली नाही, असं सांगणं दुर्दैवी असल्याची’ टीका त्यांनी केली.


हा किस्सा तुम्ही वाचलात का? – आप नेत्याला चावला उंदीर, म्हणे ‘ही भाजपची खेळी’!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -