दिशा सालियनवर बलात्कार करून हत्या

सुशांत सिंहची आत्महत्या नसून हत्या केली आहे, दिनू मौर्याच्या बंगल्यावर मंत्री काय करत होते?

narayan rane
भाजप खासदार नारायण राणेंचे भाकीत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटल्याचा खळबळजनक माहिती भाजपचे खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी मुंबईत दिली. दिशा सालियनच्या गुप्तांगावर जखमा आहेत. इमारतीवरून पडून अश्या जखमा होत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा, असेही राणे म्हणाले. तसेच सुशांत सिंह याचीही हत्या केली असून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न का केला जातोय. तसेच या प्रकरणात मुंबई पोलीस कोणाला वाचवताहेत, अभिनेता दिनू मौर्याच्या बंगल्यावर पार्टीला सरकारमधील मंत्री काय करत होते, असा सवालही राणे यांनी केला.

मंगळवारी भाजपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की, सुशांत प्रकरण हे सध्या गाजत आहे. सरकार या विषयाकडे न पाहता हा विषय दुर्लक्षित का करत आहे. सुशांतची आत्महत्या नाही, तर हत्या करण्यात आली आहे. अनेक तज्ज्ञ तेच सांगत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारची चौकशी ज्या दिशेला चालली आहे, त्यामधून या सरकारला कुणाला तरी वाचवायचं आहे हे दिसत आहे. सुशांतची हत्या झाली; पण याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अद्यापही एफआयआर दाखल केलेला नाही, असे नारायण राणे म्हणाले. बिहारमध्ये याबाबत एफआयआर दाखल झाला. पण इथे झाला नाही. 50 दिवस झाले, आरोपी कोण आहे? हे समोर आलेले नाही. जगात मुंबई पोलिसांची ख्याती आहे, नामलौकिक आहे. पण 50 दिवसांत सुशांतसोबत त्या दिवशी रात्री पार्टीला कोण होते? त्यांना अटक का करत नाही? त्याला रुग्णालयात नेणारा माणूस दोन तासांनी येतो आणि सांगतो की, मी लटकताना पाहिलंय. तो ठराविक रुग्णवाहिकाच का बोलावतो? ठराविक रुग्णालयात का नेतो? सर्व संशयास्पद घटना आहेत, असेही म्हणालो.

सुशांतच्या घराजवळ दिनू मौर्याचा बंगला आहे. तिथे रोज काही मंत्री येतात. ते तिथे तीन तास काय करतात? 13 तारखेला ते तिथे जमले आणि तिथून सुशांतच्या घरी गेले. तिथे मंत्री गेले असतील तर कॅमेर्‍यात त्यांचा ताफा वगैरे ते येणार नाहीत. सगळ्यांना माहिती आहे कोण आहे ते, ज्याअर्थी जेवढा दबाव सरकार आणि पोलिसांवर येतोय, अधिकारी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी सांगू इच्छितो, हे होऊ शकणार नाही. विरोधी पक्ष सक्षम आहे. तो अशा गोष्टी होऊ देणार नाही, असेही नारायण राणे म्हणाले. रिया चक्रवर्ती ही सुशांतची मैत्रिण, त्याच्यासोबत राहायची. ती 9 तारखेला त्याला सोडून गेली. या प्रकरणातील प्रमुख व्यक्ती तीन-चार दिवसांपासून गायब झाली आहे. पोलिसांना याबाबत माहिती नाही. मुंबई पोलीस अज्ञात असतील, असे मला वाटत नाही. मंत्री असो किंवा कुणीही असो, निरपराध मुलींवर अत्याचार करुन त्यांचा खून करण्याचे या सरकारला लायसन्स दिलेले नाही. रिया चक्रवर्तीला शोधून तिच्याकडून अधिकची माहिती घेणे आवश्यक आहे. सुशांतच्या केसमध्ये जे लोक वाचवायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी गप्प बसावे. नाहीतर त्यांच्याही कुंडल्या बाहेर काढू, असेही राणे म्हणाले.

कोरोना मृतांची संख्या कमी करून दाखवा
सामनातून पत्रकार परिषदा घेता. त्यापेक्षा कोरोनाच्या मृतांची संख्या कमी करुन दाखवा. बाधित लोकांना ठणठणीत करुन दाखवा. यावर मुख्यमंत्री आणि त्यांची माणसे का बोलत नाहीत? मुख्यमंत्र्यांची माणसे, नेते, आमदार, खासदार किंवा विभागप्रमुख कुणीच काही बोलत नाहीत. कोरोना मृतांची संख्या कमी करायला हवी. त्याला प्राधान्य दिले पाहिजे. एकतर महाराष्ट्रात सव्वा लाखापेक्षा जास्त स्टाफ कमी आहे. त्यात सुट्ट्या, काम बंद, कसा कारभार करतात.

मंत्रालयात कुणीच येत नाही
सरकार अस्तित्वात आहे का. मुंबईत आज पाऊस पडतोय असे नाही. दरवर्षी मुंबईत पाऊस पडतो. दरवर्षी पावसात एक-दोन वेळा मुंबई बंद पडते. पण सकाळीच पाऊस पडला म्हणून मंत्रालयाला सुट्टी? मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे आहे, कायमचे मंत्रालय बंद करा ना नाहीतरी कुणी येतच नाही. फक्त अधिकार्‍यांना बसण्यासाठी मंत्रालय का चालू ठेवायचे? का एवढा खर्च करायचा? एकतर वेळेवर पगार देत नाहीत. कर्मचार्‍यांना कधी 75 टक्के, 50 टक्के पैसे. कर्मचार्‍यांची आज अशी परिस्थिती आहे, असा टोला लगावला.

फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक करणार 
सुशांतच्या बँक खात्यातून झालेल्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी आता फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक करण्यात येणार आहे. सुशांतच्या पहिल्यापासून झालेल्या सर्व आर्थिक व्यवहाराचा आता मुंबई पोलीस नव्याने तपास करणार आहेत. त्याच्या वडिलांनी बिहारमध्ये लेखी अर्जाद्वारे पोलीस तक्रार करुन रियाने सुशांतच्या बँक खात्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर रियाविरुद्ध बिहार पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा मुंबईत संमातर तपास सुरु केला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांवर दबाव वाढत चालला आहे.

राज्य सरकार कोणाला वाचवतेय?
अभिनेता सुशांत सिंहच्या प्रकरणात राज्य सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही खासदार नारायण राणे यांनी केला. सुशांतच्या प्रकरणात मुंबई पोलीस योग्य दिशेने तपास करत नाहीत.पाटणामध्ये एफआयआर दाखल झाला. मात्र, मुंबई पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केलेला नाही. गेल्या ५० दिवसांत मुंबई पोलिसांनी आरोपीचा शोध का लावला नाही? असा सवालही राणेंनी केला. याप्रकरणात राज्य सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून कुणाला तरी वाचवण्यासाठी आटापीटा केला जात आहे.