4 हजार पुरणपोळ्यांचे आदिवासी वाड्यांवर वाटप

Pen
पुरणपोळी वाटप

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पेणतर्फे तालुक्यातील रायगड बाजार समोरील झोपडपट्टी, रेल्वेरुळाजवळील झोपडपट्टी, वाशी नाक्यावरील झोपडपट्टी, इंद्रनगर आदिवासीवाडी, दतवाडी, जाभुंळवाडी, जैतुची वाडी आणि विटभट्टीवर काम करणारे कामगार तसेच खरोशी परिसर या ठीकाणी व वाड्यांवर होळी सणानिमित्त 4 हजारहून अधिक पुरणपोळी, फेणी, पापड, करंज्यांचे वाटप करण्यात आले.

पेण शहरातील विविध होळी उत्सव मंडळांनी होळीसाठी मोठमोठी झाडे तोडणे टाळून टाकाऊ कचर्‍याचे दहन केले. तर काहींनी होळीऐवजी फक्त केळीच्या झाडाची फांदी लावून आपलाही सामाजिक उपक्रमात सहभाग दर्शविला.होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो होळीच्या अग्नीमध्ये समर्पित केला जातो. त्या पुरणपोळ्या एखाद्या गरीबाला मिळाव्यात व त्यालाही सणाचा आनंद मिळावा या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रभर जनजागृती सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पेण शाखेतर्फे यावर्षीही पेण कोळीवाडा, नंदिमाळ नाका, गांगल आळी, प्रभु आळी, जरी-मरी मित्रमंडळ फणसडोंगरी, गोटेश्वर मित्रमंडळ, महाकाली मित्रमंडळ-कासारआळी, कोंबडपाडा होळी उत्सव, कुंभारआळी ग्रीन सीटी गार्डन, शंकर नगर, प्रभात नगर, कवंढाळ तलाव परिसर, चिंचपाडा गाव, गोदावरी नगर, मनोहर चाळ आदी ठिकाणाहून तसेच पेणमधील इतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून साधारणतः 4000 पुरणपोळ्या, फेण्या, पापड, करंज्या होळी व धुळवडीच्या दिवशी एकत्रित करुन त्याचे आदिवासी वाड्यांमध्ये वाटप करण्यात आले.

या पुरणपोळी वाटपासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व सदस्य संदेश गायकवाड, डॉ. एस. आर. कान्हेकर, डॉ.सावणी गोडबोले, मोहीनी गोरे, मिना मोरे, प्रा. शेख, पांडुरंग घरत, नंदकुमार पाटील, सनय मोरे, चैतन्य साठे, प्रकाश मनोरे , चंद्रहास पाटील, सनिस म्हात्रे, विणु म्हात्रे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here