विद्यार्थी, शिक्षकांसाठी खुशखबर: दिवाळीची सुट्टी आता १४ दिवस मिळणार

Students get diwali leave
प्रातिनिधिक छायाचित्र

शिक्षकांच्या विरोधानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिवाळीच्या सुट्टीत ५ दिवसांवरून वाढ करत ही सुट्टी १४ दिवसांची केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला १४ दिवसांचा ब्रेक मिळणार असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गात आनंद पसरला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. आता ७ ते २० नोव्हेंबर पर्यंत दिवाळीची सुट्टी मिळणार आहे.

गुरुवारीच शालेय शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुट्टीत कपात करत ५ दिवसांसाठी सुट्टी जाहीर केली होती. ५ नोव्हेंबरच्या परीपत्रकानुसार १२ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर अशी सुट्टी देण्यात आली होती, यात आता बदल करून १४ दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या दिवाळीच्या सुट्टीच्या मागणीचा विचार करून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारपासून म्हणजेच ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

उन्हाळी सुट्टीपासून सुरू असलेल्या ऑनलाईन वर्गांना एक-दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याच्या द़ृष्टीने १२ ते १६ नोव्हेंबरदरम्यान दिवाळी उत्सव असल्याने शाळांना फक्त पाच दिवसच सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. शाळांना पूर्वी दिवाळीची सुट्टी २१ दिवस होती. शाळा संहितेच्या नावाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या कमी करण्यात येत असल्याचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर आता दिवाळीची सुट्टी १४ दिवसांची करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

शिक्षक संघटना झाल्या होत्या आक्रमक

शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन शाळांना दिवाळीची सुट्टी केवळ पाच दिवस दिल्याने या निर्णयाला शिक्षण संघटकांकडून विरोध झाला होता. शिक्षक भारती संघटनेने ५ नोव्हेंबर आणि २९ ऑक्‍टोबर रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या निर्णयांची शुक्रवारी राज्यभर होळी करण्यात आली. शिक्षक परिषदेनेही या दोन्ही निर्णयांचा निषेध नोंदवत आंदोलन केले.

शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षात शिक्षकांना ७६ सुट्ट्या घेण्याचा अधिकार दिलेला आहे. दरवर्षी शिक्षकांना १८ दिवसांची दिवाळीची सुट्टी दिली जाते. कोरोनाचे कारण पुढे करून आणि बालदिन सप्ताहासाठी शिक्षण विभागाने या वर्षी केवळ पाच दिवसांची सुट्टी जाहीर केली होती. यासाठी शिक्षक भारतीने निषेध केला आहे, असे शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी सांगितले. शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरोरे यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर भटवाडी आणि कामगार मैदान परळ येथे दिवाळी सुट्टीबाबतचा अध्यादेश आणि शिक्षकांना शाळेत ५० टक्के उपस्थित राहण्याच्या निर्णयाची होळी करण्यात आली.