भावनिक मुद्यावर चालणारे सरकार नको -अमोल कोल्हे

सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

Mahad
Amol kolhe

आगामी सरकार हे भावनिक मुद्यावर चालणारे नको तर विधायक विचार मांडणारे सरकार हवे, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार व सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी येथील चांदे मैदानावरील विराट सभेने झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे, आ. धैर्यशील पाटील, आ. अनिकेत तटकरे व अन्य नेते उपस्थित होते.

डॉ. कोल्हे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना देशात लोकशाही धोक्यात आली आहे, भावनेवर चालणारे सरकार विकास करू शकत नाही, ही प्रचाराची नव्हे तर तटकरे यांच्या विजयाची सभा आहे, असे सांगितले. 2019 ची निवडणूक ही सर्वसामान्यांच्या अपेक्षांची निवडणूक आहे. 2014 मध्ये फक्त स्वप्न दाखवली गेली. ही स्वप्न धुळीस मिळाली आहेत. अरे भाई वो तो चुनावी जुमला था, असे म्हणून लोकशाहीची क्रूर थट्टा केली गेली. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. भावनिक मुद्यासाठी तरुणांचा वापर केला जातोय, असा घणाघात त्यांनी केला.

आपली भूमिका मांडताना तटकरे यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्याची खोटी आश्वासने देण्यात आली. दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले गेले. बहुमत असूनदेखील ठोस कामे झाली नाहीत. भाजप आणि शिवसेनेचे एकमेकांवर टीका करण्यातच पाच वर्षे गेली. उद्धव ठाकरे यांनी भाजपला नालायकांचे सरकार म्हटले, मग शिवसेनेचे मंत्री यामध्ये कुठे बसतात. गेली तीस वर्षे काय काम केले ते आधी दाखवा, असा टोला त्यांनी लगावला.

जगताप यांनीदेखील सध्याची स्थिती पाहता या देशात लोकशाही आहे की, हुकूमशाही, असा सवाल करून भाजप शिवसेनेचा तमाशा आपण बघत असल्याचे टीकास्त्र सोडले. तर जयंत पाटील यांनी देश वाचवायचा असेल तर परिवर्तनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here