घरमहाराष्ट्रमोदींची काळजी वाटते, हा माणूस काय करेल माहीत नाही - शरद पवार

मोदींची काळजी वाटते, हा माणूस काय करेल माहीत नाही – शरद पवार

Subscribe

“पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत माझे बोट धरून राजकारणात आलो असे सांगतात. परंतु मला भयंकर काळजी वाटू लागली आहे की, हा माणूस काय करेल माहित नाही?” अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी दौंड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येवून गेले, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस येवून गेले आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सुद्धा येणार आहेत. आम्ही काय साधे-सुधे नाहीत, म्हणूनच हे लोक इथे येत असल्याची मिश्किल टिप्पणी पवार यांनी सभेत केली.

आम्ही ७० वर्षात काय केले, असे मोदी विचारत आहेत. परंतु त्यातील दहा वर्षे तुम्ही काय केले हे सांगा, असा प्रतिप्रश्न पवारांनी विचारला. तर मोदींनी राज्यात ७ सभा घेतल्या. त्या सभांमध्ये विषय फक्त शरद पवार हाच होता. मी शेतीच्या प्रश्नात राजकारण करत नाही, असे सांगतानाच आज देशात आणि राज्यात असलेल्या सरकारने चांगली कारखानदारी करणारी शक्ती उभी केली नाही, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

- Advertisement -

या जाहीर सभेत दौंडचे राहुल कुल यांच्या डबघाईला आलेल्या कारखान्याबाबत आणि त्यांनी मजुरांचे आणि स्थानिक ऊस उत्पादकांची थकवलेली कर्जे यावर भाष्य करताना ऊस उत्पादकांचे वाटोळे करु नका, असा सल्लाही पवारांनी दिला.

बारामती सर्वांना प्रेमात पाडणारी – सुप्रिया सुळे

माझ्या बारामतीवर सगळ्यांचे प्रेम आहे. कारण माझी बारामती आहेच तशी.. अशा शब्दात बारामतीचे कौतुक करतानाच बारामती सर्वांना हवीहवीशी वाटते म्हणूनच अनेक दिग्गज नेते बारामतीमध्ये येतात, असे सुप्रिया सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या बारामती मतदारसंघात ११ सभा होणार आहेत. हेच माझ्या बारामतीचे यश आहे, अशी स्पष्ट भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

शरद पवार पवारांना पद्मविभूषण ही पदवी भाजप सरकारने दिली आहे. मग ५० वर्ष शरद पवारांनी काय केले? हा प्रश्न का विचारता? त्यांनी काम केले नाही तर मग त्यांना नागरी पुरस्कार का दिला? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -