घरमहाराष्ट्रवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षांच्या परीक्षा होणारच

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षांच्या परीक्षा होणारच

Subscribe

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षांच्या परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना उतीर्ण करण्यात येऊ नये, तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा तातडीने घेण्यात याव्यात अशा सूचना एमसीआयने विद्यापीठांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ स्तरावरील फक्त अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचे निर्देश यूजीसीने दिले आहेत. मात्र मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षांच्या परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना उतीर्ण करण्यात येऊ नये, तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा तातडीने घेण्यात याव्यात अशा सूचना देशातील विद्यापीठांना दिल्या आहेत. एमसीआयकडून नुकत्याच परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शिका जाहीर करण्यात आली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे परीक्षा देणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ४ ऑगस्टला घेण्यात येणार्‍या वैद्यकीय अभ्यासक्रमाची उन्हाळी २०२० पदवी परीक्षा स्थगित करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. मात्र एमसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षा घेतल्याशिवाय कोणत्याही वर्गाला पुढील वर्षात प्रवेश देण्यात येऊ नये. सर्व वर्षांच्या परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण करण्यात यावे. कॉलेज सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांमध्ये एमबीबीएस अभ्याक्रमाच्या परीक्षा घ्याव्यात तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षा तातडीने घेण्यात यावे. जेणेकरून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप सुरू करणे शक्य होईल. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम व प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी देऊन कोरोनाच्या परिस्थितीनुसार त्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात अशा सूचना एमसीआयने दिल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -

२५ ऑगस्टपासून होणार्‍या पदव्युत्तर परीक्षेला उपस्थित राहणार्‍या परीक्षकांबाबतही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना एमसीआयकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. अन्य विद्यापीठातील परीक्षकांना परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष हजर राहणे शक्य नसल्यास त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांमधील शिक्षकांना अन्य कॉलेजमध्ये परीक्षक म्हणून उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.

सुपरस्पेशालिटी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने पदवी व पदवीत्त्युर परीक्षांसर्भातील मार्गगदर्शक सूचना ४ ऑगस्टला जाहीर केल्या. परंतु यामध्ये त्यांनी सुपरस्पेशालिटी परीक्षेसंदर्भात कोणत्याही सूचना न दिल्याने या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

परीक्षा घेण्यासंदर्भात मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया आणि सरकारच्या कोरोनासंदर्भातील आदेशांचे आम्ही पालन करू. त्याचप्रमाणे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यासंदर्भात अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
– डॉ. अजित पाठक, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -