घरदेश-विदेशअत्यावश्‍यक वस्तूंची साठेबाजी करू नका

अत्यावश्‍यक वस्तूंची साठेबाजी करू नका

Subscribe

रविवारी देशभर सकाळी ७ ते रात्री ९ जनता कर्फ्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासीयांना आवाहन

करोनाच्या वाढत्या संकटाला सामोरे जाण्यास आपण किती तयार आहोत, याची चाचपणी करण्यासाठी येत्या रविवारी, २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळा. त्यादिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कोणीही घरातून बाहेर पडू नये. अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी घराबाहेर पडावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले. तसेच दूध, खाण्या-पिण्याचे सामान, औषध किंवा जीवनावश्यक तुटवडा भासू नये म्हणून अनेक आवश्यक पावले उचलली जात आहेत. त्यामुळे त्यांचा साठा करू नका, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री आठ वाजता दूरदर्शनवरून देशाला संबोधित करताना करोना विषाणूंबाबत देशातील जनतेने काय काळजी घ्यायला हवी, याचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूद्वारे आपण करोनाला कसे सामोरे जाऊ शकतो हे समजेल. जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी, जनतेद्वारे लावण्यात आलेला कर्फ्यू. येत्या रविवारी म्हणजे 22 मार्चला जनता कर्फ्यू करा. 22 मार्चच्या जनता कर्फ्यूबाबत जनजागृती करा, शक्य तितक्या लोकांना माहिती द्या.

- Advertisement -

तसेच रविवारी जे डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस, मीडिया आणि आपत्कालीन सेवेत जे काम करतात त्या सर्वांचे संध्याकाळी 5 वाजता धन्यवाद माना. त्यासाठी संध्याकाळी 5 वाजता आपल्या घराच्या दरवाजात, खिडकीत, बाल्कनीत उभे राहून 5 मिनिटे उभे राहून टाळी, थाळी, घंटा वाजवून आपत्कालीन सेवेत असलेल्यांचे आभार व्यक्त करा, असे मोदी म्हणाले.या संकटाच्या वेळी माझे देशातील व्यापार्‍यांना, उच्च वर्गातील व्यक्तींना आवाहन आहे की, तुम्ही ज्या ज्या व्यक्तींकडून सेवा घेता त्यांचे आर्थिक हित लक्षात घेता त्यांचा पगार कापू नका. तेही आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत असे मानून त्यांच्या कुटुंबाचे या रोगापासून रक्षण करण्यासाठी त्यांना होईल ती आर्थिक मदत करा.

भारतासारख्या विकसनशील देशावर करोनामुळे आलेले आर्थिक संकट मोठे आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोविड-१९ टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. हा टास्क फोर्स करोना आणि देशाच्या आर्थिक बाबींबाबत आगामी काळात वेळोवेळी निर्णय घेईल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. संपूर्ण जग यावेळी मोठ्या संकटातून जात आहे. याअगोदर जेव्हा कधी कोणतं नैसर्गिक संकट आलं तेव्हा ते फक्त काही देशांपुरता मर्यादित होतं. मात्र, यावेळी संपूर्ण जगात मानव जातीवर संकट ओढावलं आहे. पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं होतं तेव्हाही एवढे देश प्रभावित झाले नव्हते जेवढे आज करोनामुळे झाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यांपासून करोनाच्या विविध बातम्या आम्ही बघत आणि ऐकत होतो. या दोन महिन्यात भारताच्या 130 कोटी नागरिकांनी करोनासारख्या महामारीचा खंबीरपणे लढा दिला आहे. सर्वांनी सावधगिरी बाळगण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असे वातावरण निर्माण झाले आहे की, आपण संकटापासून वाचलेलो आहोत. असे वाटते सगळे ठिक आहे. मात्र, ते खरं नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने सतर्क राहणं जरुरीचं आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

करोनाचा सामना करण्यासाठी संकल्प आणि संयमाची आवश्यकता आहे. आज देशवासियांनी संकल्प करायला हवा की मी नागरीक म्हणून माझ्या कर्तव्याचे पालन करीन. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करीन. आपण स्वत: करोनाच्या संसर्गापासून वाचू आणि इतरांनाही वाचवू. गरज नसेल तर घराबाहेर पडणार नाही. स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा संयम प्रत्येकाने पाळायला हवा, असेही मोदी म्हणाले.

देशवासियांकडून मी जेव्हा कधी काहीही मागितले तेव्हा मला त्यांनी नाराज केले नाही. ही आपल्या आशीर्वादची ताकद आहे. आपण सगळे मिळून आपल्या निर्धारित लक्षाच्या पाठीमागे चालत आहोत. प्रयत्न यशस्वीही होतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मी आज 130 करोड नागरिकांकडून काही मागायला आलो आहे. मला आपले पुढचे काही आठवडे हवे आहेत. आपला येणारा वेळ हवा आहे. आतापर्यंत विज्ञान करोनावर कोणतेही योग्य उपाय शोधू शकलेले नाही. यावर कोणतीही लस तयार झालेली नाही. अशा परिस्थितीत चिंता वाढणे स्वाभाविक आहे. याप्रसंगी सध्या देशातील हॉस्पिटलांवर मोठा भार आहे. त्यामुळे रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जाऊ नका, अत्यावश्यक नसेल तर सर्जरी पुढे ढकला, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे.

जगभरात करोनाचा प्रभाव जास्त दिसत आहे. तिथे अजून एक गोष्ट समोर आली आहे. या देशांमध्ये सुरुवातीला कमी लोक प्रभावित झाले होते. त्यानंतर अचानक आजाराचा विस्फोट झाल्याचे समोर आले. या देशांमध्ये करोनाने संक्रमित लोकांची संख्या खूप वेगाने वाढली,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत सरकार करोनाच्या संसर्गावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. मात्र, काही देश असेही आहेत ज्यांनी आवश्यक निर्णयही घेतले आणि करोनावर नियंत्रण मिळवलं, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संकल्प आणि संयम हेच करोनावरील औषध

=अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोविड-१९ टास्क फोर्सची स्थापना.
=कर्मचार्‍यांचे पगार कापू नका, दुकानदार-मालकांना आवाहन.
=मला तुमचे पुढील काही आठवडे हवे आहेत.
=हा कसोटीचा प्रसंग आहे. आपण सारेजण धीराने सामोरे जाऊ.
=मला काय होणार नाही, असे मानून निश्चिंत होऊ नका.
=रुटीन चेकअपसाठी न जाता फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घ्या.
=अत्यावश्यक नसल्यास नियोेजित सर्जरी पुढे ढकला.
=६० ते ६५ वर्षांच्या नागरिकांनी घराबाहेर पडू नका.
=भारत सरकारचे करोनाच्या संसर्गावर पूर्णपणे लक्ष.
=राष्ट्ररक्षकांचे रविवारी सायंकाळी ५ वाजता आभार माना.
=भारत किती सज्ज आहे हे पाहण्यासाठी जनता कर्फ्यू आहे.
=मी तुमच्याकडे जे जे काही मागितले, ते तुम्ही मला दिलेत.

करोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय

=येत्या २२ मार्चपासून परदेशांमधून येणारी विमाने भारतीय विमानतळांवर उतरू दिली जाणार नाहीत. ही बंदी एक आठवड्यासाठी लागू असेल.
=करोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे वय ६० हून अधिक आहे. त्यामुळेच ६५ पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये.
=१० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनीदेखील घरीच राहावे, त्यांना घराबाहेर पडू देऊ नये, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
=रेल्वे आणि विमान प्रवासादरम्यान मिळणार्‍या सर्व सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांगांना यातून वगळले आहे.
=प्रत्येक राज्यांनी खासगी क्षेत्रातल्या सर्व कंपन्यांना त्यांची कार्यालये बंद ठेवण्याच्या सूचना देऊन वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश द्यावेत.
=सरकारी कार्यालयांमधील गर्दी टाळण्यासाठी द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या सर्व कर्मचार्‍यांना एक आठवडाआड कामावर येण्याचे आदेश.
=डॉक्टर, पोलीस, ड्रायव्हर, आपत्कालीन सेवा आणि मीडियातील कर्मचार्‍यांना यातून वगळण्यात आले आहे.

करोनासाठी मंत्रालयात नियंत्रण कक्ष
करोनाबाबत मंत्रालयात दालन क्रमांक ६०३ मध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून या कक्षाची जबाबदारी प्रधान सचिव भूषण गगराणी आणि अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा यांच्याकडे आहे.

नगरमध्ये पोलिसांनी सक्तीने दुकाने केली बंद
अहमदनगर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस रस्त्यावर उतरले असून त्यांनी सक्तीने दुकाने बंद केली आहेत. तसेच फेरीवाल्यांनाही रस्त्यावरून हुसकावून लावण्यात आले आहे. शहरात कोणत्याही ठिकाणी गर्दी होता कामा नये, त्यामुळे पोलिसांनी ही पावले उचलली आहेत.

विलगीकरण कक्षातून पळाल्यास कारवाई
करोनाचे काही संशयित रुग्ण विलगीकरण कक्षातून पळून जात असल्याने विलगीकरण कक्षातून पळून जाणार्‍यांविरोधात कारवाई करा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेत.

करोनासाठी बिल गेट्स यांच्याकडून १० कोटी डॉलर्स
जगभरात करोनाने हाहा:कार घातला आहे. या विषाणूचा सामना करण्यासठी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या गेट्स फाउंडेशनने 10 कोटी डॉलर देण्याची घोषणा केली. आहे. एवढेच नाही, तर याशिवाय वॉशिंग्टनच्या मदतीसाठीही 50 लाख डॉलर देणार असल्याचे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

एसी लोकल 31 मार्चपर्यत बंद
मुंबईच्या प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेची एसी लोकल सुरक्षेचा उपाय म्हणून येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.

रेल्वेचे १९ लाख प्रवासी घटले
करोनाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने गर्दीची ठिकाणी टाळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचे 12 लाख आणि पश्चिम रेल्वेचे 7 लाख प्रवासी कमी झालेत.

दोन महिन्यांचे रेशन आगाऊ मिळणार
करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सोय व्हावी म्हणून स्वस्त धान्य दुकानात एप्रिल सोबतच मे व जून महिन्याचे धान्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना रेशन घेण्यासाठी घराबाहेर पडावे लागणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -