Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर महामुंबई डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवणार

डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवणार

दोन वर्षांत काम पूर्ण खर्च ३०० कोटींनी वाढला

Mumbai
Dr. Ambedkar will raise the monument height
डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवणार

मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीजवळ इंदू मिल येथे होणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला आहे. या निर्णयाला बुधवारी मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली असून आता आंबेडकरांचा पुतळा हा ३५० फूट इतका उंच करण्यात येणार आहे. या अगोदर या स्मारकाची उंची २५० फूट इतकी होती. दरम्यान, उंची वाढविण्याचा निर्णय घेताना या प्रकल्पासाठी वाढीव खर्चास देखील मान्यता देण्यात आली असून त्यानुसार ३०० कोटींचा खर्च वाढणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत दिली.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी वरील माहिती दिली.

यावेळी कॅबिनेट मंत्री धनजंय मुंडे हे देखील उपस्थित होते. या निर्णयाची घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. गेल्या सरकारने या प्रकल्पासाठी काय काम केले, यावर भाष्य न करिता हा प्रकल्प कशा प्रकारे पूर्णत्वास नेईल, यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर राम सुतार यांच्या निदर्शनाखाली हा पुतळ्याचे काम केले जाणार आहे. तर सध्या आम्ही आगामी अर्थसंकल्पावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की, यापूर्वी या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. आजच्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा 100 फूट व पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण सल्लागार शशी प्रभू यांनी केले.

या पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढेल तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये 6.0 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील. या स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच 1000 लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.

८ दिवसांत परवानग्या
या प्रकल्पाबाबत ज्या काही परवानग्या बाकी आहेत. त्या संदर्भात येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्याची सूचना संबंधित सचिवांना करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. त्यानुसार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर सीआरझेडची देखील परवानगी आवश्यक असणार आहे.

दोन टप्प्यात निधी देणार
या प्रकल्पासाठी वाढीव दिली हा दोन टप्प्यात दिला जाणार असून दोन्ही टप्प्यात ५०० कोटी असे दोन टप्प्यात निधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

केंद्राकडून परवानग्या शिल्लक नाहीत
दरम्यान, या प्रकल्पाची उंची वाढविल्यामुळे त्यासाठी आवश्यक परवानग्यासंदर्भात त्यांच्याकडे विचारण केली असता अजित पवार म्हणाले की, या प्रकल्पासाठी केंद्राकडून कोणतीही परवानगी शिल्लक नाही. त्यामुळे या प्रकल्पाला लवकरच गती मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.