घरमहाराष्ट्रविरोधी पक्षनेत्याच्या बदल्यात उपसभापतीपद

विरोधी पक्षनेत्याच्या बदल्यात उपसभापतीपद

Subscribe

आघाडी आणि युतीमध्ये अखेर समेट

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे देऊनही युतीने आधी विधान परिषदेतील उपसभापतीपदावरील दावा काँग्रेसने सोडावा, अशी अट घातली. अखेर सोमवारी काँग्रेसने विधान परिषदेतील उपसभा-पतीपदावरील दावा सोडल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांची विधान परिषदेतील उप-सभापतीपदी बिनविरोधी निवड झाली. त्यानंतर लागलीच विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांचे नाव घोषित करण्यात आले.

अशा प्रकारे युती आणि आघाडीमध्ये विधानसभेतील विरोधीपक्षनेत्याच्या बदल्यात परिषदेतील उपसभापतीपद देण्यात आले.

- Advertisement -

आमदार जोगेंद्र कवाडे यांनी उपसभापतीच्या निवडीतून माघार घेतल्याने डॉ. नीलम गोर्‍हे यांचा मार्ग मोकळा झाला. विधान परिषदेच्या उपसभापती पदावर विराजमान झालेल्या डॉ. गोर्‍हे ह्या पहिल्या महिला असल्याचा बहुमानही त्यांना प्राप्त झाला. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे १७ जुलै २०१८पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते.

संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने या पदावर दावा केला होता. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या जागी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधीपक्षनेते पदासाठी निश्चित करून तसे पत्र काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहिले. परंतू उपसभापतीपदाचा दावा केल्यास विरोधीपक्ष नेतेपद देणार नाही, असा पवित्रा भाजप-शिवसेनेन घेतल्याने अखेर काँग्रेसने नाइलाजाने उपसभापती पदावरचा दावा सोडला आणि शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे यांना उपसभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे १७, काँग्रेसचे १६, भाजपचे २३ , शिवसेनेचे १२, लोकभारती, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षचा प्रत्येकी १ आमदार आहे तर, ६ अपक्ष आमदार आहेत.

- Advertisement -

डॉ. नीलम गोर्‍हे शिवसेनेच्या उपनेत्या तसेच प्रवक्त्या असून विधान परिषदेत दीड दशकापासून आमदार म्हणून सक्रिय ्रआहेत. प्रवक्त्या म्हणून त्या माध्यमांसमोर शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडतात. महिलांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आग्रही भूमिका मांडणार्‍या डॉ. गोर्‍हे ह्या शिवसेनेची पुणे जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत आहेत. आतापर्यंत तीन वेळा त्या परिषदेवर निवडून गेल्या आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या विशेष हक्क समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यातून एकमेव जागेवर पक्षाला विजय मिळवून देत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्याची नामुष्की टाळली. त्यानंतर विधानसभेतील उपनेते असलेले विजय वडेट्टीवार यांना अपेक्षेप्रमाणे बक्षीस मिळाले. विधानसभा गटनेतेपदी त्यांची बढती झाली.

विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी. वेणुगोपाल यांनी राज्यातील फेरबदलाचे आदेश जारी केले होते. त्यानंतर दोन्ही सभागृहाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. सभागृहातील उपनेते असल्याने विजय वडेट्टीवार नेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यानुसार पक्षाने त्यांना गटनेता करण्यात आले होते.

विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते म्हणून फक्त 6 दिवसांचा कालावधी मिळाला आहे. त्यामुळे कसोटी आणि वन डे न खेळता त्यांनी कमी कालावधीत 20-20 गेम खेळावा. काही लोक अधिवेशन संपल्यानंतर रथयात्रा की जत्रा काढणार आहेत. त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी वडेट्टीवार यांनी देखील राज्यव्यापी दौरा करावा.
– अजित पवार, विधीमंडळ गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस

सर्व सभागृहाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली, त्याबद्दल सर्व सभागृहाचे आभार मानते. सगळ्या समाजसुधारकांमुळे महिलांना आज ही संधी मिळत आहे. 60 वर्षांनी मला ही संधी मिळत आहे. ही निवडणूक चांगल्या पद्धतीने व्हावी, यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले, माझ्या घराण्यात राजकीय वारसा नसतानाही हा बहुमान मिळाला आहे.
– डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -