घरमहाराष्ट्रबेड न मिळाल्याने ईएनटी स्पेशालिस्ट डॉ.भावेंचे निधन

बेड न मिळाल्याने ईएनटी स्पेशालिस्ट डॉ.भावेंचे निधन

Subscribe

मुंबईतील नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. चित्तरंजन भावे यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. एका करोना रुग्णावर वांद्रे येथील रहेजा रुग्णालयात केलेल्या तातडीच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना करोनाची लागण झाली होती. माहिमला ‘दै. आपलं महानगर’च्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सहयोग इमारतीत त्यांचे क्लिनिक होते. भावे रहेजा हॉस्पिटलशी ते संलग्न होते. डॉ. भावेंना करोनाची लागण झाल्याने त्यांची पत्नी आणि मुलीला क्वारंटाईन करण्यात आले आहे. डॉ. भावे यांना मागील आठवड्यात अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी रहेजा रुग्णालयात बेड मिळण्यासाठी फोन केला मात्र त्यावेळी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने सहा तासांनंतर त्यांना रुग्णालयात बेड मिळाला. रहेजा रुग्णालयात त्यांच्यावर चार दिवस उपचार सुरू होते. मात्र सोमवार संध्याकाळी त्यांचे निधन झाल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले.

डॉ. चित्तरंजन भावे यांचे वय ६१ वर्षे होते, त्यांना मधुमेह होता आणि हृदयविकाराकरिता त्यांची शस्त्रक्रियासुद्धा झाली होती. असे असूनसुद्धा मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि या करोनाच्या महासाथीत समाजाची सेवा म्हणून ते त्यांच्या शस्त्रक्रिया आणि रुग्ण तपासण्या अखंडितपणे करत होते, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. या काळात त्यांनी एका रुग्णाची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना लक्षणे जाणवू लागल्यामुळे कोव्हिड-१९ची तपासणी करून घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली.

- Advertisement -

डॉ. भावे हे मुंबईच्या रहेजा रुग्णालयाला संलग्न असल्यामुळे त्यांनी त्या इस्पितळाला फोन करून आपल्याला तिथे दाखल व्हायची इच्छा दर्शवली. यावेळी रहेजा रुग्णालयात जागा शिल्लक नसल्याने त्यांना थोडा काळ वाट पाहण्यास सांगितले गेले. त्यानंतर डॉ. भावे स्वतःच्याच घरी होते. सुमारे सहा तासांनी त्यांना रुग्णालयातून जागा रिकामी झाल्याचा फोन आल्यावर ते स्वतः आपली कार चालवत रुग्णालयात दाखल झाले. तिथे चार दिवस त्यांच्यावर रूममध्ये उपचार झाल्यावर त्यांची तब्येत खालावल्याने आणि त्यांना प्राणवायूची गरज लागते आहे असे लक्षात आल्याने त्यांना तेथीलच आय.सी.यु.मध्ये हलवण्यात आले. तिथे त्यांना व्हेंटिलेटर आणि डायलिसीसचे उपचार देण्यात आले; पण त्यादरम्यान दुर्दैवाने त्यांचे निधन झाले, अशी माहिती डॉ. भोंडवे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -