घरमहाराष्ट्रडॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक - डॉ. श्रीकांत शिंदे

डॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक – डॉ. श्रीकांत शिंदे

Subscribe

'डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी नवा कठोर कायदा व्हावा, यासाठी लोकसभेत मी खासगी विधेयक मांडले', असे डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.

‘डॉक्टरांवरील हल्ले वाढत चालले असून असे प्रकार रोखण्याची आवश्यकता आहे. यासाठी कठोर कायदे बनविण्यासाठी मी डॉक्टर या नात्याने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन महायुतीचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उल्हासनगर शाखेच्या मेळाव्यात ते बोलत होते. डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रयत्नांची माहिती याप्रसंगी शिंदे यांनी दिली. ‘डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी नवा कठोर कायदा व्हावा, यासाठी लोकसभेत मी खासगी विधेयक मांडले आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी देखील रुग्णांप्रती असलेली जबाबदारी काटेकोरपणे पाळावी’, असे ते याप्रसंगी म्हणाले.

‘डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भातील विधेयक लोकसभेत मांडले’

आपण डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भातील विधेयक लोकसभेत मांडले, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. ‘डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण असून अस्वस्थता आहे. लोकसभेत शून्य प्रहराच्या माध्यमातून २० मार्च २०१७ रोजी देशभरातील डॉक्टरांच्या भावना मांडल्या आणि हल्लेखोरांना कठोर शासन करावे, जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल, अशी मागणी मी लोकसभेत केली. त्यानंतर पुन्हा गतवर्षी २०१८ च्या हिवाळी अधिवेशनात डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांना जरब बसेल, असा कायदा असलेले खासगी विधेयक लोकसभेत मांडले. याद्वारे हल्लेखोरांना किमान सहा महिने ते कमाल पाच वर्षे कारावासाची शिक्षा, तसेच किमान पाच हजार ते कमाल पाच लाख रुपये दंड अशी करण्याचे प्रस्तावित करण्यात आली’, अशी माहिती शिंदेंनी दिली.

- Advertisement -

श्रीकांत शिंदेचे मानले आभार

डॉक्टरांचीही रुग्णांप्रती जबाबदारी असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आजाराची आणि उपचारांची संपूर्ण माहिती देणे, होणाऱ्या संभाव्य परिणामांची कल्पना देणे, डॉक्टर आणि रुग्णालयांना या कायद्यान्वये बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. डॉक्टरांचा एक सक्षम प्रतिनिधी लोकसभेत असल्याबाबत या मेळाव्यात उपस्थित डॉक्टरांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचे योग्य प्रकारे नियमन व्हावे, यासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या संदर्भात डॉक्टरांची बाजू सरकारकडे जोरकसपणे मांडल्याबद्दलही शिंदे यांचे आभार मानण्यात आले. उल्हासनगर येथे दंतचिकित्सकांच्या संघटनेच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. याही मेळाव्यात सहभागी होत उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला. याप्रसंगी माजी आमदार कुमार आयलानी, चंद्रकांत बोडारे, राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -