घरमहाराष्ट्रआता ST भरतीमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य!

आता ST भरतीमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य!

Subscribe

राज्य मार्ग परिवहन महामंडळात दुष्काळग्रस्त भागातील तरुण-तरुणींना संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात मंगळवारी विधानसभेत माहिती दिली.

सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने १२ दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील ४४१६ तसेच कोकण प्रदेशातील जिल्हे वगळता इतर ९ जिल्ह्यांत ३६०६ अशा एकूण राज्य परिवहन महामंडळामध्ये ८०२२ चालक आणि वाहकांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीमध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.


हेही वाचा – एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार

१८२३ उमेदवार कोकण विभागात

परिवहन विभागाने राज्यातील बेरोजगार तरुण, विधवा महिला, शहीद जवानांचे वारस, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वारस, दुष्काळग्रस्त भागाताली तसेच सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिवाकर रावते यांनी दिली. तसेच २०१६-१७ मध्ये चालक आणि वाहक पदाची चाचणी उत्तीर्ण असलेल्या ९४५ तसेच किरकोळ त्रुटीच्या तपासणीनंतर पात्र ठरलेल्या आणि वाहन चाचणी उत्तीर्ण झालेल्या ८७८ अशा एकूण १८२३ उमेदवारांना कोकण प्रदेशांतर्गत विभागात सामावून घेण्यात येणार असल्याचेही रावते यांनी सांगितले. तसेच मागच्या पाच वर्षांत सामाजिक बांधिलकी आणि उत्तरदायित्व लक्षात घेऊन परिवहन विभागाने एकूण रोजगार ३८,१९८, परवाना वाटप २,६४,५६९ आणि बॅज वाटप ३,५८,३७६ असा एकूण ६ लाख २२ हजार ९४५ इतक्या रोजगार आणि स्वयंरोजगाराची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती दिवाकर रावते यांनी दिली.

- Advertisement -

२१ आदिवासी युवतींना प्रशिक्षण

महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २१ आदिवासी युवतींना एसटीमध्ये चालकपदी नियुक्ती देण्यासाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण सुरु केले आहे. या प्रशिक्षणात युवतींना अटी आणि शर्तींमध्ये शिथिलता दिली असून प्रशिक्षणाच्या दरम्यन मोफत पास, गणवेश आणि विद्यावेतन दिले जाणार असल्याची माहितीही रावते यांनी दिली.


हेही वाचा – एसटी आणि हॉटेल चालकांचे दर वाढले

ऑटोरिक्षा-टॅक्सीचालकांना बॅजेस

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्यासाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना अंमलात आणण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेद्वारे ३९२ अर्जदारांना ऑटोरिक्षाचे परवाने वितरीत केले आहेत. तसेच परिवहन विभागाद्वारे मागील साडे चार वर्षांत ३ लाख ५८ हजार ३७६ ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना बॅजेस देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच राज्यात २ लाख ३२ हजार ३९ रिक्षांचे आणि ४९०१ टॅक्सीचे परवाने जारी करण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -