व्यापाऱ्यांच्या आग्रहामुळे पुण्यातलं लॉकडाऊन हटवावं लागलं – अजित पवार

ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर संबंधीत अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पुण्याचं लॉकडाऊन हळूहळू हटवण्याचं मुख्यमंत्र्यांचं मत होतं, मात्र व्यापाऱ्यांच्या आग्रहामुळे पुण्यातलं लॉकडाऊन हटवावं लागलं, अशी माहिती दिली. शिवाय, २५ ते ३० टक्के नागरिक मास्कचा वापर करत नाहीत, अशी खंत बोलून दाखवली.

“व्यापारी मंडळी लॉकडाऊन उठवायला सांगत आहेत. मग लॉकडाऊन का उठवत नाही.” व्यापारी वर्ग सतत विनंती करत होता. व्यापारी वर्गाच्या आग्रहामुळे लॉकडाऊन उठवावा लागला, असं अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी ऑक्सिजनचे सिलेंडर राज्यातल्या काही भागात मिळत नाहीत. वैद्यकीय उपचारासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. त्यामुळे त्याचं प्रमाण वाढवणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

कोरोनाची लस येईपर्यंत सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं गरजेचं आहे. यावेळी अजित पवारांना पुण्यातील जम्बो रुग्णालयासंदर्भात विचारण्यात आलं. पुण्यातील जम्बो रुग्णालया सगळ्या गोष्टी व्यवस्थित उभ्या केल्या. आज रुग्णालय उघडल्यानंतर ८०० रुग्ण व्हायला वेळ लागेल असं काहींना वाटलं. मात्र, जम्बो रुग्णालयात दोन-तीन दिवसात ३००-४०० पर्यंत रुग्णांची संख्या वाढली, असं अजित पवारांनी सांगितलं.

केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी- प्रकाश जावडेकर

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी पुणेकरांना दिला. कोरोनाची लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे. एकजुटीने या संकटाचा सामना करु, असं प्रकाश जावडेकरांनी आवाहन केलं आहे.

नागरिकांनी मास्क वापरणं सक्तीचं असून पुणेकरांनी नियमांचं पालन करावं. मास्कबाबत जनजागृतीची गरज आहे. . मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.

कोरोनाची चैन तोडणं गरजेचं आहे. कंटेनमेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. कोरोनाला हरवण्यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. जनजागृतीसाठी गणपती मंडळ, नवरात्र मंडळ आणि इतर अनेक सामाजिक संस्थांची मदत घेणार असल्याचं ते म्हणाले. तसंच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय गरजेचा असून सर्व यंत्रणा एकत्र मिळून काम करतील. कोरोना संबंधित प्रत्येक गोष्टीची ताजी माहिती सर्व यंत्रणांमार्फत दिली जाणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.