घरमहाराष्ट्रकोरोनाकाळात सव्वा लाख बेरोजगारांना मिळाला रोजगार

कोरोनाकाळात सव्वा लाख बेरोजगारांना मिळाला रोजगार

Subscribe

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने सुरू केलेल्या महास्वयंम वेबपोर्टलद्वारे कोरोनाकाळात ऑक्टोबरपर्यंत तब्बल १ लाख १५ हजार ९२८ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकर्‍या जाऊन त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली. मात्र कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने सुरू केलेल्या महास्वयंम वेबपोर्टलद्वारे कोरोनाकाळात ऑक्टोबरपर्यंत तब्बल १ लाख १५ हजार ९२८ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना दिलासा मिळाला आहे.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने सुरू केलेल्या महास्वयंम वेबपोर्टलद्वारे जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान १ लाख ४८ हजार ३४३ बेरोजगारांना रोजगार मिळाला. त्यातील 1 लाख 15 हजार 928 जणांना कोरोनाकाळात रोजगार मिळाला. यातील ऑक्टोबरमध्ये ३० हजार ५०० बेरोजगारांना रोजगार मिळाला. ऑक्टोबरमध्ये विभागाकडे ५५ हजार ८९० इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात २० हजार ७९३, नाशिक विभागात ५ हजार ३७५, पुणे विभागात १४ हजार ५७७, औरंगाबाद विभागात ९ हजार ९१५, अमरावती विभागात २ हजार ७१७ तर नागपूर विभागात २ हजार ५१३ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. यातील कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ३० हजार ५०० उमेदवार नोकरीला लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक १६ हजार ३४९, नाशिक विभागात १ हजार ४५८, पुणे विभागात ७ हजार ५६५, औरंगाबाद विभागात ३ हजार १०६, अमरावती विभागात १ हजार १४५ तर नागपूर विभागात ८७७ इतक्या बेरोजगार उमेदवारांना नोकरी लागली.

- Advertisement -

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे. नोकरीइच्छूक तरुणांनी वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी केले.

कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत.
– नवाब मलिक, मंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -