घरमहाराष्ट्रमुलींवरील लैंगिक अत्याचार रोखा, पुणे जि.प. शाळांना तंबी!

मुलींवरील लैंगिक अत्याचार रोखा, पुणे जि.प. शाळांना तंबी!

Subscribe

गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये अल्पवयीन वयोगटातील मुली शिक्षण घेत असतात. सर्व शिक्षकांनी अशा मुलाींबरोबर वास्तविक पाहाता पालकत्वाच्या नात्याने वागणे अपेक्षित असते. परंतु काही शिक्षक या नात्याला काळीमा फासणारी कृत्ये करतात असे दिसून येत आल्याचे परिपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी काढले आहे. त्यामुळे पुण्यातल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या पाचावर धारण बसली आहे. कार्यकारी अधिकाऱ्यांचया या परिपत्रकामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांसाठी नियम कडक केले जाण्याची शक्यता आहे.

शिक्षक-शाळांचे अक्षम्य दुर्लक्ष

काही अल्पवयीन वयोगटातील मुलींना शिक्षकांच्या कृत्याचा मतितार्थ देखील समजत नाही, तर काही मुलींना अशा वर्तनाचा त्रास होऊन देखील लोकलज्जेस्तव त्या बाबींची वाच्यता त्या करत नाहीत. काही प्रकरणांमध्ये मुलींनी अशा वर्तनाबाबत तक्रार केली असता शिक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा उलटपक्षी मुलींना समजवण्याचा प्रयत्न करतात. अशा सर्व बाबी सक्षम कार्य संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत हानीकारक असल्याचे सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

काय होणार कारवाई?

समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्राथमिक कर्तव्य असल्याने त्याला हानी पोहोचेल अशी कोणतीही बाब अत्यंत काटेकोरपणे हाताळणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही शिक्षकाच्या विरोधात अशा स्वरुपाची तक्रार मुलींनी स्वतः केल्यास त्याची गंभीर दखल संबंधित मुख्याध्यापकांनी घ्यावी, अशा प्रकरणाची प्राथमिक चौकशी त्या शाळेतील महिला शिक्षकांनी तीन दिवसांच्या आत करावी आणि त्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या तक्रारींमध्ये तथ्य दिसून येईल, त्या प्रकरणांमध्ये संबंधित शिक्षिका व शिक्षकाविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत आणि अन्य तरतुदी अंतर्गत तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी करावी असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. जर संबंधित मुलींनी अशी तक्रार यापूर्वी काही शिक्षिका अथवा शिक्षकांकडे केली असेल आणि त्या शिक्षिका वा शिक्षकांनी याबाबत अहवाल गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केला नसेल, तर त्यांनादेखील या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, असे या पत्रकात बजावण्यात आले आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – चाकणमध्ये शिक्षकानेच केले मुलींचे लैंगिक शोषण!

आदर्श निर्माण करण्याची गरज

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आपण सर्वजण आपल्या मुलींना उत्तम शालेय वातावरण देण्यासाठी कटिबद्ध आहोत. जेणेकरून मुली उत्तम शिक्षण घेऊन समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, असा विश्वास सुरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -