एकनाथ खडसे, कटप्पा आणि शिवसेना!

eknath khadse
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

राज्यात एकीकडे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि कंगणा रणौत (Kangana Ranaut) प्रकरणावरून गोंधळ सुरू असताना शिवसेना आणि भाजप या पारंपरिक मित्र पण आता विरोधी पक्षांमधला वाद या ना त्या कारणाने समोर येताना दिसत आहे. कंगणा रणौत प्रकरणावरून हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर असताना आता एकनाथ खडसेंची नाराजी या जुन्या प्रकरणावरून पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांमध्ये वाक् युद्ध होण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांनी नुकतीच पक्षाचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खरमरीत टीका केलेली असताना त्यावर शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शाब्दिक कोटी करत थेट खडसेंना शिवसेनेत यायचं निमंत्रणच देऊन टाकलं आहे. ‘एकनाथ खडसे हे भाजपचे बाहुबली होते. पण कटप्पाने त्यांना मारलं. कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे सगळ्यांना माहिती आहे. पण एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असताना त्यांचा बिसमिल्लाह केला’, असा खोचक टोमणा अब्दुल सत्तार यांनी मारला आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्यानंतर त्याच वक्तव्यावर अब्दुल सत्तार यांनी भाजपाला टोमणा लगावत खडसेंना शिवसेनेत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. ‘खडसे शिवसेनेत आले तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. त्यांनी OBC समाजाला घेऊन शिवसेनेत यावं, आम्ही उद्धव ठाकरेंशी बोलू. पण खडसेंची एक समस्या आहे. ते फक्त बोलतात, पण निर्णय घेत नाहीत. खडसे भाजपचे बाहुबली होते. पण कटप्पाने बाहुबलीला मारलं’, असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. आता खडसे शिवसेना प्रवेशाचं हे आमंत्रण स्वीकारतात का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

‘कारस्थानाचे पुरावे जनतेसमोर आणणार’!

दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकांनंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासोबतच पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्या नाराजीनाट्याचा पहिला प्रवेश चांगलाच रंगला होता. त्यानंतर रीतसर पद्धतीने ते नाराजीनाट्य संपलं देखील होतं. पण आता पुन्हा एकदा खडसेंनी आपलं नाराजीअस्त्र उगारत देवेंद्र फडणवीसांना पुन्हा लक्ष्य केलं आहे. ‘माझं नाव जेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी समोर आलं, त्यामुळेच मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला गेला. मनिष भंगाळेलाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यरात्री दीड वाजता भेटले होते. ते कशासाठी? अजित पवारांसोबत फडणवीस तीन दिवस सरकारमध्ये होते. त्यामुळे त्यांच्यावर फडणवीस टीका करू शकत नाहीयेत. मला तिकिट नाकारलं याचं मला दु:ख नाही. पण माझ्यावर भलते-सलते आरोप केले ते माझ्या जिव्हारी लागले. आता या कारस्थानाचे पुरावे मी जनतेसमोर आणणार आहे’, असा थेट इशाराच खडसेंनी दिला आहे.