महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार

New Delhi
graduation election
भारतीय निवडणूक आयोग

दिल्लीत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज, २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येतील. गेल्या दिवसांपासून मुख्य निवडणूक आयोगाच्या बैठका होत आहेत. अखेर आज विधानसभेचे बिगुल वाजणार अशी घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे. नेमकं या निवडणुकीतील मतदान दिवाळीपूर्वी होईल की दिवाळीनंतर याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र होणार आहे. हरियाणामध्ये २ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात यायला हवे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वीच मतदान घ्यावे लागणार आहे. निवडणूक कायद्यानुसार निवडणूक प्रक्रिया ही किमान ३० दिवसांची असणे बंधनकारक आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत बैठकांवर बैठका घेतल्या होत्या. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयोगाचे मंगळवारी मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांमधील धाकधूक वाढली होती. त्या दिवशी निवडणूक आयुक्तांचा बैठकांचा धडाका लागला होता. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षकांसोबत त्यांची बैठक झाली. तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक खर्च देखरेखविषयक विभागांसोबतही त्यांनी चर्चा केली होती. शिवाय महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गृह विभागाचे सचिव व इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबतही बैठक पार पडली होती. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील लोकांची धाकधूक वाढली आहे. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली असून आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होत आहे.

हेही वाचा –

पुलवामा सारखा हल्ला पुन्हा झाला नाही तर महाराष्ट्रात परिवर्तन नक्की – शरद पवार