‘राजिप’ विषय समिती सभापती बिनविरोध

शिवसेनेची नाराजी

Mumbai

रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली. शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन सभापतीपदे आली. शिवसेना सदस्यांनी यावेळी गैरहजर राहून आपली नाराजी व्यक्त केली.

चार सभापतींची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या येथील मुख्यालयातील कै. प्रभाकर पाटील सभागृहात बुधवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील ठिकठिकाणी अशी आघाडी होत आहे. परंतु शिवसनेला रायगडचे पालकमंत्रीपद मिळले नसल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या सभेस शिवसेनेच्या सदस्यांनी गैरहजर राहून आपली नाराजी व्यक्त केली. महिला आणि बालकल्याण सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता जाधव, तर समाजकल्याण सभापतीपदासाठी शेकापचे दिलीप भोईर यांनी अर्ज भरला. सभापती क्रमांक 1 साठी शेकापच्या अ‍ॅड. नीलिमा पाटील, तर सभापती क्रमांक 2 साठी राष्ट्रवादी काँग्र्रेसचे बबन मनवे यांनी अर्ज भरला होता. चारही सभापतीपदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी जाहीर केले.

महिला आणि बालकल्याण, तसेच सामजकल्याण या विषय समित्यांच्या सभापतींची निवड विशेष सभेत थेट केली जाते. त्यानुसार जाधव आणि भोईर यांची अनुक्रमे त्या समित्यांच्या सभापतीपदी निवड झाली. उर्वरित सभापती क्रमांक 1 आणि सभापती क्रमांक 2, तसेच उपाध्यक्ष (हेही एका समितीचे पदसिद्ध सभापती असतात) यांच्याकडे कोणत्या विभागाचे सभापतीपद द्यायचे याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे. त्यामुळे अ‍ॅड. नीलिमा पाटील, मनवे आणि उपाध्यक्ष सुधाकर घारे यांना समित्यांसाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here