सुगवेजवळ वीजवाहिन्यांचे स्फोट

महावितरणाचे दुर्लक्ष , ग्रामस्थांमध्ये भीती

Mumbai

तालुक्यातील वारे वीज उपकेंद्रासाठी टाकलेल्या वाहिन्या जमिनीवर मोकळ्या पडून असल्यामुळे सुगवे गावाजवळ या वीजवाहिन्यांचे स्फोट होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महावितरण कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

वारे येथे महावितरण कंपनीचे वीज उपकेंद्र उभारले जात आहे. त्याचे काम कंपनीच्या ठेकेदाराकडून सुरू आहे. उपकेंद्राला जोडणारी पाच इंच व्यासाची काळ्या रंगाची केबल मुरबाड रस्त्याने नेण्यात आली आहे. या केबलला सुगवे गावाजवळ काही ठिकाणी जॉइंट आहेत. त्यात ही मुख्य वीज वाहिनी असलेली केबल जमिनीखालून न टाकता रस्त्यावर मोकळी सोडण्यात आली आहे. त्या केबलमुळे ग्रामस्थ संकटात आले आहेत. कारण गेला महिनाभर त्या केबलचे स्फोट होत आहेत. दिवसरात्र हा प्रकार सुरू आहे. मात्र रात्री होणारे स्फोट आणि त्यातून निर्माण होणारा जाळ यामुळे ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत.

याबाबत सुगवे ग्रामस्थ असलेल्या बोरिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच क्षीरसागर यांनी महावितरण कंपनीचे उप अभियंता आनंद घुले यांना पत्र देऊन त्या केबलचा बंदोबस्त करण्याची सूचना केली होती. मात्र महिना उलटला तरी महावितरण कंपनीने काहीही केलेले नाही. दुसरीकडे ती केबल मुरबाड-कर्जत रस्त्याच्या कडेला पडलेली असून त्या ठिकाणी नाशिकहून जेएनपीटीकडे जाणारे ट्रकचालक विश्रांतीसाठी थांबतात. त्यात एखादा ट्रक केमिकल किंवा ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारा असल्यास आणि त्यावेळी केबलचे स्फोट झाल्यास पूर्ण सुगवे गाव जळून भस्मसात होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आम्ही केबल जमिनीमध्ये टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले, त्याचवेळी तुकडे असलेली केबल त्या ठिकाणी लावल्याने स्फोट होण्याचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण असेच सुरू राहिल्यास मोठा अपघात होऊ शकतो.
-भूषण पेमारे, सामाजिक कार्यकर्ते

वारे येथील उपकेंद्राचे काम करणार्‍या ठेकेदाराला केबल जमिनी खालून नेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचवेळी त्या ठिकाणी तुकडे जोडले असतील तर तेथे अखंड केबल टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-आनंद घुले,उप अभियंता महावितरण, कर्जत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here