‘ग्रेड’ हुकल्यास अकरावी, बारावीचे विद्यार्थी अनुत्तीर्ण

अकरावी-बारावीला यंदापासून सुरू केलेल्या पर्यावरण, आरोग्य व जलसुरक्षा विषयात विद्यार्थ्यांना ‘ड’ ग्रेड मिळाल्यास ते अनुत्तीर्ण ठरणार आहेत. अन्य सर्व विषयांत विद्यार्थी उत्तीर्ण होऊनही ‘ड’ ग्रेड मिळणार्‍या विद्यार्थ्यांवर अनुतीर्णतेचा शिक्का बसणार आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीसाठी ही ग्रेड पद्धत लागू करण्यात येणार असून, पुढील वर्षी बारावीसाठी लागू होणार आहे. पर्यावरण आरोग्य आणि जल सुरक्षेच्या संदर्भात विद्यार्थी अधिक जागृत व्हावेत, यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

शालेय शिक्षण विभागाने यंदा अकरावीचा अभ्यासक्रम नवीन आणला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार अध्ययन पद्धतीतही अनेक बदल करण्यात आले आहेत. याच बदलानुसार अकरावी-बारावीला पर्यावरणाबरोबरच आरोग्य आणि जल सुरक्षेचा विषय आणला आहे. पर्यावरणाच्या विषयाला पूर्वी 50 गुण देण्यात येत असत. त्यामध्ये आता आरोग्य आणि जलसुरक्षा विषय जोडण्यात आला आहे.

परंतु नव्या अभ्यासक्रमानुसार या विषयांना आता 50 गुणऐवजी ‘ग्रेड’ देण्यात येणार आहेत. यात अ, ब, क, ड असे चार ’ग्रेड’ देण्यात येणार आहेत. ग्रेड पद्धतीमध्ये 30 गुण हे थिअरी तर 20 गुण हे प्रकल्पासाठी असणार आहेत. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना आरोग्य, पर्यावरण आणि जल सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा, कार्यक्रम आयोजित करावे लागतील. तसेच प्रकल्पाच्या माध्यमातून जल सुरक्षेचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना नागरिकांमध्ये जावे लागणार आहे. त्यासाठी हे गुण ग्रेडच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना जर ‘ड’ ग्रेड मिळाल्यास त्यांना अनुतीर्ण ठरवण्यात येणार आहे. अन्य विषयांमध्ये विद्यार्थी उतीर्ण झाला असेल आणि या विषयांमध्ये ग्रेड हुकल्यास त्या विद्यार्थ्यावर अनुतीर्णतेचा शिक्का बसणार आहे.

राज्यभरात यासंदर्भात हजारो शिक्षकांना प्रशिक्षण देऊन शालेय शिक्षण विभागाकडून पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे. मात्र शिक्षण विभागाच्या ग्रेड पद्धतीला विविध शिक्षक संघटना, शिक्षक आमदार आणि शिक्षण संस्थांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिकार्‍यांसाठी विशेष प्रशिक्षण
पर्यावरण, आरोग्य व जलसुरक्षा या विषयांसदर्भात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या पद्धतीची शिकवण दिली जावी यासाठी नुकतेच पुण्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अधिकार्‍यांसाठी विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. त्यानंतर मुंबईसह राज्यातील विविध ज्युनियर कॉलेजमधील शिक्षकांना हे प्रशिक्षण दिल्याची माहिती शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकारी सूत्राकडून देण्यात आली. मुंबई विभागाकडून ठाणे, कल्याण, पालघर, रायगड अलिबागमधील विविध ज्युनियर कॉलेजांचा समावेश होता.

मुंबईत येथे झाले प्रशिक्षण
मुंबईमध्ये दक्षिण विभागातील गिरगावमधील लीलावती लालजी दयाळ ज्युनियर कॉलेज, घाटकोपरमधील आर.जे. कॉलेज, विलेपार्ले येथील वांद्रे डहाणूकर कॉलेज आणि मालाडमधील चिल्ड्रन वेल्फेअर सोसायटीच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये हे प्रशिक्षण झाले.