CoronaVirus: भाजपा कर्यकर्तेही सरसावले मदतीला, सर्व जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा कार्यरत

भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नऊ कुटुंब दत्तक घेऊन त्यांना मदत करायची आहे. या माध्यमातून देशभरातील १०५ कोटी लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. ज्या व्यवस्था होत नाहीत, त्या आपण भाजपा म्हणून करायच्या, हाच आपल्या कामाचा मूड आणि मोड असला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.

Maharashtra
bjp
भाजप

करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने सर्व जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा आढावा आणि आणखी काय सुधारणा करता येईल, यासाठी राज्यातील प्रमुख भाजपा नेत्यांची आज ऑडिओ ब्रिजद्वारे एक बैठक घेतली. माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक या ऑडिओ ब्रीजला उपस्थित होते. येणार्‍या काळात कोअर कमिटी, राज्यातील सर्व खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष अशासुद्धा व्हिडिओ-ऑडिओ बैठकांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले.

हेही वाचा – Coronavirus Live Update: प्रत्येक कामगाराला २ हजार रुपयांचा लाभ मिळणार – निर्मला सीतारामन

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारी यंत्रणेला मदत करत अधिकाधिक लोकांना मदत करण्याबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रत्येकाला पुढचे २१ दिवस घरी थांबण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी आपण सामाजिक-राजकीय क्षेत्रात काम करत असल्याने प्रत्येक गरिब आणि गरजूंना मदत मिळाली पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. अशा या सेवा कार्यास पोलिसांकडूनसुद्धा परवानगी आहे. ही सारी कामे करताना गर्दी होणार नाही, आपल्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊनच हे काम आपल्याला करावे लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात लोकांना भाजपाची एक हेल्पलाईनसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नऊ कुटुंब दत्तक घेऊन त्यांना मदत करायची आहे. या माध्यमातून देशभरातील १०५ कोटी लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. ज्या व्यवस्था होत नाहीत, त्या आपण भाजपा म्हणून करायच्या, हाच आपल्या कामाचा मूड आणि मोड असला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना यावेळी दिल्या.

या समस्या मंथनातून पुढे आल्या

 • लॉकडाऊनपूर्वी रूग्णालयात दाखल परंतू आता बर्‍या झालेल्या व्यक्तींना घरी पाठवण्याची व्यवस्था. यात बाळंतपण झालेल्या महिलांना प्राधान्य देऊन घरी पोहोचते करणे. कारण, रूग्णालयांकडे तशी कोणतीही व्यवस्था नसल्याचे ते सांगत आहेत.
 •  रूग्णालयात असलेल्यांच्या भोजनाची व्यवस्था करणे
 • अनेक ठिकाणी डॉक्टरांनी आपल्या ओपीडी बंद केल्या आहेत. वैद्यकीय मदत प्रत्येकाला मिळेल, हे सुनिश्चित करणे
 • पोलिसांकडून पत्रकार, शासकीय अधिकारी, आमदार, आपत्कालीन स्थितीत सेवा देणारे यांना अटकाव केला जात आहे. स्थानिक वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलून त्यावर मार्ग काढणे
 •  ज्येष्ठ नागरिकांना घरपोच त्यांची औषधं पोहोचवणे
 • गरजूंना रूग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून देणे
 • नियमित डायलिसीस किंवा केमोथेरपीची गरज आहे, अशांना संपूर्ण मदत करणे
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे मोफत धान्य त्या कुटुंबांपर्यंत पोहोचेल, हे सुनिश्चित करणे
 • प्रत्येक झोपडपट्टींमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटाईझरचे वाटप करणे
 • २० दिवस पुरतील, अशा धान्य आणि आवश्यक सामुग्रींचे पॅकेज गरजूंपर्यंत पोहोचविणे. चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत आता ही संख्या १५०० पाकिटं प्रतिदिवस अशी झाली आहे.
 • रस्त्यावर ड्युटीवर तैनात यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेणे. त्यांची वैद्यकीय तपासणी होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत, त्यादृष्टीने स्थानिक यंत्रणांशी समन्वय
 • सफाई कर्मचारी यांच्याही आरोग्याकडे विशेषत्त्वाने लक्ष पुरवणे
 • मंगल कार्यालये, हॉटेल्समध्ये तात्पुरते किचन स्थापन करून आरोग्य, स्वच्छतेची काळजी घेत गरजूंच्या भोजनाची व्यवस्था करणे
 • धुणी-भांडी, घरकाम करणार्‍या महिलांना तातडीने मदत पुरवणे
 • किराणा दुकानदार, आटाचक्की येथील गर्दी टाळून तेथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यास मदत करणे, तसेच काही किराणा दुकानदारांकडून काळाबाजारी करण्यात येत आहे, तेथे तातडीने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हस्तक्षेप करणे
 • अन्य राज्यांतून आलेले मजूर जेथे आहे, तेथेच त्यांना थांबण्यास सांगणे आणि त्यांच्या जेवण, रोजगाराची काळजी घेणे. ज्या ठिकाणी ठेकेदार त्यांना वेतन देण्यास तयार नसतील, तेथे समाजातील काही दानशूरांच्या मदतीने स्वत: व्यवस्था करणे
 • अशी मदत पोहोचवण्यास पोलिसांकडून काही अडचणी आहेत, तेथे स्थानिक पोलिस स्थानकाकडून तसे पासेस उपलब्ध करून घेणे
 • काही स्थानिक लोक अन्य राज्यात, शहरांमध्ये प्रवासासाठी गेले होते. त्यांना तेथेच थांबण्यास सांगून आपल्या तेथील कार्यकर्त्यांमार्फत त्यांच्या खुशालीवर लक्ष ठेवणे.

नागपूरच्या पदाधिकारी-नगरसेवकांशीही संवाद 

दुसर्‍या टप्प्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि शक्तीकेंद्र प्रमुखांशी संवाद साधला. यात नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि सुमारे १००० कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागपूर शहरातील जंतुनाशक फवारणी, गरजूंना अन्न वाटपाची स्थिती, औषध पुरवठा, सॅनेटाईझरची मोठ्या प्रमाणात उपलब्धता इत्यादींबाबत त्यांनी सविस्तर चर्चा पदाधिकार्‍यांशी केली आणि प्रदेश स्तरावरील यंत्रणेशी संपर्क ठेवत समन्वयाने वरील सर्व क्षेत्रात काम करण्याच्या सूचना केल्या. कार्यकर्त्यांच्या विविध प्रश्नांना, शंकांना सुद्धा त्यांनी यावेळी उत्तरे दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here