घरदेश-विदेशअश्रूंच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल

अश्रूंच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल

Subscribe

धुळे8पुलवामामधे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आमचे जवान शहीद झाल्याने देशभरातून आक्रोश होतो आहे. याबरोबरच प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी भरलेले आहे. आमच्या जवानांनी या देशासाठी बलिदान दिले आहे. देशातील जवानांच्या मातांच्या डोळयांतून आलेल्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल. आता देशातील प्रत्येकाने त्यांच्या परिवाराच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. येणार्‍या दिवसात आता आमच्या जवानांवर बंदुक चालवणारे आणि दहशतवाद्यांना बंदुक देणार्‍यांना आमचे जवान चोख प्रत्युत्तर देतील, हे आता जग देखील पाहिल, असा इशारा धुळ्यातून शनिवारी (१६ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

अश्रूंच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल

- Advertisement -

शहरातील मालेगाव रोडवरील गोशाळा मैदानावर शनिवारी नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणे, याबरोबरच विविध योजनांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जळगावचे खासदार ए. टी. पाटील, नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावीत, महापौर चंद्रकांत सोनार, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजीमंत्री एकनाथ खडसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी एक मिनिट सभेस आलेला हजारोंचा जमाव शांत उभा राहिला; पण त्यानंतर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा सुरू झाल्या.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळे व शिंदखेडा तालुक्यासाठी वरदान ठरणार्‍या सुळवाडे जामफळ योजनेचे भूमिपूजन झाले. तर मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील धुळे-नरडाणा रेल्वे मार्गाचे भूमिपूजन झाले. यावेळी खानदेशातून गुजरात राज्यात तीन नवीन रेल्वे गाड्या सुरू झाल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे भुसावळ ते वांद्रे, उदना ते पाळधी, नंदुरबार ते उधना या तीन नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मनमाड-इंदूर रेल्वे तसेच सुळवाडे जामफळ योजनांची आवश्यकता सांगितली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धुळे जिल्ह्यातून सात महामार्गांचे बळकटीकरण होत असून यातून देशभराबरोबर या जिल्ह्याचा संपर्क वाढणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणारा हा जिल्हा आता उद्योगाचे केंद्र बनणार आहे. या जिल्ह्यात आता डीएमआयसीच्या माध्यमातून अनेक उद्योग येणार असून त्यामुळे हजारो हाताना काम मिळणार असल्याचे सांगितले आहे.

अहिराणी बोलताच टाळ्याचा गजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिराणी भाषेत खान्देशातून आलेल्या हजारो लोकांबरोबर संवाद साधण्यास सुरूवात केली. त्यांनी अहिराणी भाषेत सांगताच लोकांनी टाळ्यांचा गजर करून एकच जल्लोष केला. या देशाला आपल्या सैन्यदलातील जवानांनी भरभरुन सेवा दिली आहे. या देशातील जवानांच्या मातांच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूंच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल. जगात भारताला संवेदनशील देश म्हणून ओळखले जाते. आमचे जवान आता दहशतवादाला चोख उत्तर देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

धुळे जिल्हा मानाचा तुरा ठरणार
धुळे शहराच्या जवळ एक औद्योगिकनगर बनण्याची शक्यता आहे. या शहरातून देशातील प्रत्येक शहरातील व्यापार आणि उद्योगाबरोबर लिंक होणार आहे. धुळे शहरातून वेगवेगळ्या दिशेला सात महामार्ग जातात. त्यात आता रेल्वेमार्गदेखील सक्षम होत असल्याने भविष्यात धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रात मानाचा तुरा ठरणार आहे. राज्यात पाण्याची कमतरता असून दुष्काळाचे सावट आहे. पण यातून शेतक-याला त्रास होणार नाही, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मराठवाडा, विदर्भ व अन्य दुष्काळग्रस्त भागात 91 सिंचन प्रकल्पांना विशेष मंजुरी दिली आहे. सुमारे 14 हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे काम केले जाणार आहे. यातून पावणे चार लाख हेक्टर पेक्षा जास्तीची शेती सिंचनाच्या कक्षेत येणार आहे. शेतकर्‍यांना सिंचन योजनांच्या माध्यमातून जोडणे असो किंवा दुष्काळात त्यांच्या झालेल्या नुकसानीपासून त्यांना वाचविण्यासाठी केंद्रातील सरकार प्रामाणिकपणे काम करते असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. धुळ्यात सभास्थळ असलेल्या मैदानाची जागा गोपालनासाठी स्वातंत्र्य सैनिक रामेश्वर पोतदार यांनी दिली. केंद्र सरकार देखील देशभरात गोवंशच्या सेवामधे काम करणा-यांसाठी कामधेनु आयोग तयार करणार आहे. हा आयोग केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने काम करणार आहे. जगातील सर्वात मोठी योजना म्हणून आयुष्यमान भारत योजनेकडे पाहिले जाते. आज या योजनेच्या काही लाभार्थींना मी भेटलो. त्यांना आरोग्याच्या उपचारासाठी सरकारी मदत मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात आलेले भाव अनुभवल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार गोटे सभेपासून दूर
कार्यक्रमात खान्देशातील सर्व नेत्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा संपल्यानंतर काही वेळ संवाद साधला. तर एरव्ही पक्षात राहूनदेखील मतभेद असणारे माजी मंत्री एकनाथ खडसे व मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील काहीवेळ संभाषण केले. या सभेत धुळे शहराचे भाजपचे आमदार अनिल गोटे सभेच्या मंचावर दिसले नाहीत. धुळ्यात 2014 मधे झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेत नेतृत्त्व करणारे गोटे हे आजच्या सभेपासून दूर असल्याचे दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -