प्रकाश आंबेडकरांना ० जागा! एक्झिट पोलचा अंदाज

राज्यातल्या ४८ पैकी ४७ जागांवर उमेदवार उभ्या करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता येणार नसल्याचा अंदाज राज्यातल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

Mumbai
Prakash Ambedkar
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

मतदानाचा शेवटचा टप्पा रविवारी संध्याकाळी संपला आणि धडाधड सर्वच एक्झिट पोल्सचे अंदाज वृत्तवाहिन्यांवर झळकू लागले. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर सर्वच एक्झिट पोलने भाजपप्रणीत एनडीएच्या बाजूने कौल दिला असला, तरी राज्य पातळीवर मात्र भाजपला अनेक राज्यांमध्ये फटका बसल्याचं चित्र आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलने वर्तवला आहे. महाराष्ट्राचा विचार करता यावेळी राज ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईल प्रचार, प्रकाश आंबेडकरांनी राज्यभर उडवून दिलेला प्रचाराचा धुरळा, ४७ उमेदवारांसोबत लढणारी वंचित बहुजन आघाडी या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप या दोन सत्ताकेंद्री पक्षांपासून कौल विरोधकांकडे वळू शकेल, वंचित बहुजन आघाडी काहीतरी आश्चर्यकारक करू शकेल असे तर्क लढवले जात होते. मात्र, एक्झिट पोलमध्ये तसं काहीही नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

प्रकाश आंबेडकर स्वत: देखील होणार पराभूत?

नेल्सन, सी व्होटर, इंडिया टुडे अशा कोणत्याही सर्व्हेने महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळेल असा अंदाज वर्तवलेला नाही. नेल्सनने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात भाजपला १७, शिवसेनेला १७, काँग्रेसला ४, राष्ट्रवादी काँग्रेसला ९ तर इतर १ असं चित्र असेल. आणि ही इतर १ असलेली जागा देखील स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून हातकणंगलेतून उभ्या राहिलेल्या राजू शेट्टी यांच्या पदरात पडल्याचा अंदाज आहे. सी-व्होटरने तर भाजपप्रणीत युतीला ३४, काँग्रेसला ४ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९ जागा मिळतील आणि इतर पक्ष भोपळा देखील फोडू शकणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या सर्व आकडेवारीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी मोठं रान पेटवलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या हाती धत्तुराच येणार असल्याचं सर्वे सांगत आहेत.


हेही वाचा – LIVE : एक्झिट पोल जाहीर; वाचा कुणाची होणार एक्झिट!

प्रचारसभांचा झंझावात ठरेल फोल?

दरम्यान, फक्त प्रकाश आंबेडकरच नसून एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांच्यासाठी देखील हा एक्झिट पोल निराशाजनकच राहिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघासोबत आघाडी करून महाराष्ट्राच्या लोकसभा वर्तुळामध्ये चंचुप्रवेश का होईना, पण करता येईल, या अपेक्षेने राज्यभर विविध ठिकाणी प्रकाश आंबेडकरांसोबतच जोमाने प्रचार करणाऱ्या एमआयएमला जनतेनं नाकारलं आहे. औरंगाबादमध्ये मोठा वाद निर्माण करून पदरात पाडून घेतलेल्या जागेवर देखील एमआयएम-वंचित बहुजन आघाडीला पराभव पत्करावा लागू शकतो, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.