स्फोटांच्या मालिकेने खोपोली हादरली

Mumbai
KHOPOLI

शहर व परिसर पुन्हा एकदा स्फोटाच्या मालिकेने हादरून गेला असून ही घटना विहारी गावानजीक इंडिया स्टील कारखान्यात घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. मात्र या कारखान्यात नेहमी होणार्‍या स्फोटांमुळे खोपोलीकर भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. प्रशासन या कारखान्याला का पाठीशी घालत आहे, असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

मध्यरात्री अचानक भयंकर आवाज होऊन अनेक घरांच्या खिडक्या, दरवाजे हलले. सुरुवातीला या घटनेबाबत विविध शंका व भीतीचे वातावरण पसरले. मात्र काही वेळात घटनेचे कारण स्पष्ट झाले. इंडिया स्टील कंपनीच्या प्लांटमधील विजेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन मोठा स्फोट झाला. त्यामुळे आग लागली. सदर आग उत्पादन विभागापर्यंत पसरली व लागोपाठ तीन स्फोट होऊन कंपनी परिसर हादरला. या कंपनीत वारंवार अशा घटना घडत असतात. एक महिन्यापूर्वीही भट्टीत असाच स्फोट होऊन परिसर हादरला होता. हे प्रकरण ताजे असताना गुरुवारी मध्यरात्री पुन्हा एकदा एकामागून एक असे सलग तीन स्फोट झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.

इंडिया स्टील कंपनीत अशा प्रकारे स्फोट होण्याच्या अनेक घटना सातत्याने घडूनही कंपनी प्रशासन फार गांभीर्याने याकडे पाहत नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच प्रशासन या कारखान्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाी. त्यामुळे यात कोणता ‘अर्थ’ दडलाय, असा सवाल नागरिकांना पडला आहे.