योग्यता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ; विद्यार्थ्यांना दिलासा

विद्यार्थी व महाविद्यालयांची होणारी अडचण लक्षात घेऊन योग्यता प्रमाणपत्र सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत राज्य मंडळाकडून मुदतवाढ देण्याचा आली आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना आपले योग्यता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. परंतु यंदा कोरोनामुळे कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना योग्यता प्रमाणपत्र सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर विद्यार्थी व महाविद्यालयांची होणारी अडचण लक्षात घेऊन योग्यता प्रमाणपत्र सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत राज्य मंडळाकडून मुदतवाढ देण्याचा आली आहे.

दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी विविध बोर्डाच्या कॉलेजांमध्ये व विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत असतात. यावेळी विद्यार्थ्यांना योग्यता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमी दहावी व बारावीचे निकाल उशीरा जाहीर झाला. त्यातच आता अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांना दहावी संदर्भातील स्थलांतर प्रमाणपत्रे, गुणपत्रक इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे उपलब्ध होण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्रे सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याची मागणी महाविद्यालयांकडून करण्यात येत होती. याची दखल राज्य मंडळाने १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच विलंब शुल्कासह १५ फेब्रुवारीपर्यंत, अतिविलंबासह ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाने जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे राज्याबाहेरील किंवा परदेशातील मंडळातून उत्तीर्ण होऊन आलेल्या बारावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान ही मुदतवाढ तात्पुरत्या स्वरुपाची असून, पुढील वर्षी नियमित तारखांप्रमाणेच योग्यता प्रमाणपत्र सादर करण्याची तारीख असेल, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.