चाकरमान्यांनो ! जादा एसटीपण फुल्ल

गणेशोत्सवासाठीच्या अतिरिक्त गाड्या बुक

Mumbai
एसटी बस

गणेशोत्सव म्हटला की,कोकणात जाणार्‍यांची तुफान गर्दी असते. सर्वाधिक गणेश भक्तांचा कल हा रेल्वेने जाण्याकडे असला तरी रेल्वेची सेवा सर्वांना पुरेल असेच नाही.त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या या निर्णयाला कोकणातील गणेशभक्तांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात सोडण्यात येणार्‍या 2 हजार 200 जादा गाड्यांपैकी 2 हजार 6 गाड्यांचे आरक्षण मंगळवारपर्यंत फुल झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

गणेशोत्सवासाठी अद्याप 20 दिवसांचा अवकाश उरला असला, तरी एसटी मात्र हाऊसफुल्ल झाली आहे. गणेशोत्सवासाठी एसटीने कोकणात जाणार्‍या भाविकांसाठी जाहीर केलेल्या 2200 गाड्यांपैकी 2006 जादा बसगाड्यांचे आरक्षण झाले आहे. तर 1 हजार 155 गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. सोबतच 602 जादा गाड्यांचे पूर्णतः आरक्षण झाले असून 249 गाड्यांचे अंशतः अर्थात 70 ते 80 टक्के बुकिंग झालेले आहे.

त्यामुळे कोकणवासियांना आणखी जादा गाड्यांची गरज भासणार आहे. गणेशोत्सवासाठी पहिल्या टप्प्यातील जादा वाहतूक 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत होणार असून त्यापैकी 31 ऑगस्ट रोजी सर्वाधिक गाड्या धावणार आहेत. त्यामुळे शनिवारी कोकणाकडे जाणार्‍या मार्गावर वाहतूक कोंडीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या जादा गाड्या मुंबईसह ठाणे आणि पालघरमधून देखील सुटणार आहेत.