आई आयसीयूत, आरोग्यमंत्री टोपे मिशन करोनावर

Mumbai
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे दररोज सकाळी मुंबर्ईच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील आईची विचारपूस करतात आणि नंतरच राज्याच्या ‘मिशन करोेना’च्या ड्यूटीवर रवाना होतात.

मागच्या दोन आठवड्यापासून राज्याची जनता करोनामुळे चिंतेतआहे. त्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र डॉक्टर, विविध संस्था, माध्यमे यांच्या समोर येऊन आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहेत. विशेष म्हणजे करोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला, त्याच दरम्यान राजेश टोपे यांच्या मातोश्री बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या त्या आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्यांचा मुलगा राज्यावरील आलेल्या संकटाशी मोठ्या जबाबदारीने लढा देत आहेत.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेव्हा पहिल्यांदा राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत करोनाबाबत निवेदन दिले, तेव्हाच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे कौतुक केले होते. घरातील अडचण विसरुन तुम्ही राज्यासाठी झटत आहात, असे गौरवोद्गार सभापतींनी काढले होते.

आरोग्य मंत्री असूनही टोपेंनी आपल्या आईच्या काळजीसोबतच सध्या आपल्या जबाबदारीला प्राथमिकता दिलेली आहे. करोनाचा उद्रेक झाल्यापासून ते सकाळी काही मिनिटे आईची विचारपूस करतात आणि मग पूर्ण दिवस ते करोनावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या कामास लागतात. पुणे जिल्ह्यात पहिला रुग्ण सापडल्यापासून आरोग्य खात्याच्या बैठका, विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची धावपळ, चाचणीचे किट मिळावे म्हणून केंद्राकडे पाठपुरावा, निधीची तरतूद अशी आव्हाने टोपेंनी लीलया पेलली आहेत.

१४ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे दोघेच माध्यमांमध्ये दिसत आहेत. स्टेज ३ मध्ये आपण जाऊच नये, यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. प्रसंगी अनेक कठोर निर्णयही त्यांनी मोठ्या सहजतेने घेतले आणि तेवढ्याच नाजुकपणे लोकांना समजावूनही दिले. पत्रकारांच्या प्रत्येक तिरकस प्रश्नांचेही ते शांतपणे निरसन करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून टोपे अवघ्या दोन ते तीन तासांची झोप घेत आहेत. प्रवासात गाडीतच जेवण घेत आहेत, अशी माहिती टोपेंच्या कर्मचार्‍यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here