मराठा आरक्षण : फडणवीस सरकारच्या सांगण्यावरुन मी युक्तिवाद केला नाही

fadnavis govt had asked me not to appear in maratha reservation case

राज्यातील मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं असतानाच मराठा आरक्षण प्रकरणी फडणवीस सरकारबद्दल महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठा आरक्षणावरून माजी सरकारी वकिलांनी महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यावर आरोप केले. या आरोपांचं खंडन करताना फडणवीस सरकारने सांगितल्यामुळेच मी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केला नाही, असा खुलासा कुंभकोणी यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती देत हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवलं. यानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हे आरोप-प्रत्यारोप सुरु असताना महाराष्ट्र सरकारचे माजी वकील निशांत कटनेश्वरकर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोश कुंभकोणी यांच्यावर आरोप केला. आशुतोश कुंभकोणी मराठा आरक्षण प्रकरणी युक्तिवाद करण्यासाठी एकदाही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात गेलेले नाहीत. महाधिवक्ता म्हणून युक्तिवाद करणं त्यांचं कर्तव्य होतं. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळं आजच्या निर्णयाला तेही जबाबदार आहेत,’ असं कटनेश्वरकर यांनी म्हटलं होतं.

या आरोपाचं खंडन करताना महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितल्याप्रमाणे २०१९ च्या सुनावणीत आपण न्यायालयात बाजू मांडली नाही. असं असलं तरीही कागदोपत्री सरकारची बाजू भक्कम करण्याचे काम आपण यावेळी केलं,” असं कुंभकोणी यांनी सांगितलं. त्यावेळच्या देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात आपले आभार मानले असंही त्यांनी सांगितलं आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.

मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात फेब्रुवारी २०१९ मध्ये सुनावणीला सुरुवात झाली होती. त्याआधी जानेवारी महिन्यात सोलापूर येथे मराठा संघटनांची बैठक झाली. या बैठकीत सरकारच्यावतीने माजी महाधिवक्ता व्ही. ए. थोरात यांना युक्तिवाद करण्याची परवनागी द्यावी, अशी मागणी मराठा संघटनांनी सरकारकडे केली होती. राज्य सरकारने ती मागणी मान्य करून थोरात यांना संधी देण्याची विनंती माझ्याकडे केली होती. त्या विनंतीला मान देऊन मी खटल्यापासून दूर राहिलो होतो, असं कुंभकोणी यांनी म्हटलं आहे. मी प्रत्यक्ष युक्तिवादापासून दूर राहिलो असलो तरी सरकारने दिलेलं मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकावं म्हणून मी प्रयत्न केले होते, असं देखील कुंभकोणी यांनी सांगितलं.