पक्षात कोणालाच विश्वासात न घेतल्याचा फडणवीसांना फटका

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मन की बात

Mumbai
devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस

राज्यात विधानसभा निवडणु-कीचा निकाल लागून १४ दिवस झाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार असून पक्षातील कोणालाच विश्वासात न घेतल्याचा मोठा फटका मुख्यमंत्र्यांना बसला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपलं महानगरशी बोलताना ’मन की’ बात बोलून दाखवली.

मुख्यमंत्र्यांच्या या वागण्याचा फायदा उचलून विरोधक शिवसेनेला पुढे करून सत्ता स्थापन करू शकतात आणि तसे झाले तर राज्यात भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. निकालानंतर एका आठवड्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येणे अपेक्षित होते. पण, मुख्यमंत्री आणि सत्तेतील सम समान वाटा यावरून भाजप आणि शिवसेनेनमध्ये कोंडी निर्माण झाली ती अद्याप सुटलेली नाही. फडणवीस हे सोमवारी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटून आले. त्यानंतर तिढा सुटेल, असे वाटत होते. मात्र अजूनही डेडलॉक कायम आहे. तोपर्यंत फडणवीस यांनी दिल्लीतील, राज्यातील कोणत्याच वरिष्ठ नेत्यांशी संपर्क ठेवलेला नव्हता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरही फडणवीस यांचे बोलणे होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन हे तिघे सध्या पुढे दिसत असले तरी त्यांना शिवसेनेबरोबर चर्चा करण्याचे कोणतेच अधिकार दिलेले नाहीत. विशेष म्हणजे प्रसार माध्यमांशीही अंतर ठेवून बोलायचे, अशा सक्त सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. ‘मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार’ याप्रमाणे फडणवीस यांनी सर्व अधिकार आपल्या हातात ठेवले असतील तर अशाने सरकार बनणे कठीण आहे आणि दोन एक दिवसानंतर सत्तेतून वजा भाजप असे काही वेगळेच चित्र दिसू शकते, अशी भीतीही भाजपच्या एका मोठ्या नेत्याने व्यक्त केली.

एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित अशा जेष्ठ नेत्यांचे तिकीट कापून फडणवीस यांनी भाजप पक्षात आधीच अस्थिरता निर्माण केली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडेही पराभूत झाल्याने मुख्यमंत्र्यांना ’मार्ग’ दाखवणारे नेते आज त्यांच्या बरोबर नाहीत. गिरीश महाजन हे फडणवीस यांचे संकटमोचक समजेल जात असले तरी एवढी मोठी सत्तेची कोंडी फोडण्याएवढे किमयागार ते नाहीत. याशिवाय प्रसाद लाड, प्रवीण दरेकर अशा दुसर्‍या पक्षातून आलेल्या लोकांना फडणवीस यांनी अती जवळ केल्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज तर आहेतच, पण त्यांना मातोश्रीही जवळ करणार नाही, याकडे भाजप पक्षातील सूत्रांनी लक्ष वेधले.

गडकरींना विचारले नाही
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे फडणवीस यांचे गुरु समजले जातात. गडकरी यांनी त्यांचा हात धरून त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात समर्थपणे उभे केले. मग कर्तृत्वाच्या जोरावर फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत झेप घेतल्यानंतर आपल्या गुरूशी आधीसारखे संबंध त्यांनी ठेवले नाहीत. अंतर राखूनच फडणवीस त्यांच्याशी वागले. आता सत्तेची कोंडी झाल्यानंतर त्यांनी गडकरी यांना विश्वासात घेतले असते तर या अनुभवी नेत्याने त्यामधून नक्की मार्ग काढला असता. विशेष म्हणजे मातोश्रीबरोबर चर्चेचे दरवाजे त्यांनी खुले केले असते, अशी माहिती नागपूरमधील भाजपच्या एका नेत्याने दिली.

अल्पमतातील सरकार धोकादायक
फडणवीस यांनी विश्वासात घेतले नसले तरी सत्तेची कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गडकरी यांना नागपूरला बोलावून यातून काही मार्ग काढता येतो का याची चाचपणी केली होती. पण, फडणवीस हे कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला सत्तेत समसमान वाटा देण्यास तयार नसल्याने अल्पमतातील सरकार आणून मग विधानसभेत बहुमताचा आकडा सिद्ध करायचा, अशी एक व्यूहरचना होती. पण त्याला संघाने स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे समजते.

युतीची शक्यता मावळली
फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर समन्वयाची दारे बंद केल्याने महायुतीची शक्यता जवळपास मावळली असल्याची माहिती समोर येत आहे. या परिस्थितीत शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल आणि काँग्रेस या सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, अशी जोरदार चर्चा भाजपमध्ये सुरु झाली आहे.