घरमहाराष्ट्रपोटासाठी राज्यभर भ्रमंती 30 रुपयांच्या टोपलीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह

पोटासाठी राज्यभर भ्रमंती 30 रुपयांच्या टोपलीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह

Subscribe

ठाणे: राज्यभर फिरायचे. टोपल्या बनवायच्या. त्या विकून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. जळगावच्या ७२ वर्षीय सीताबाई सोनेने गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारे आपले आयुष्य जगत आहेत. यावेळी त्या आपल्या कुटुंबासह ठाण्यात आल्या आहेत. दिवसभर एक ते दोन टोपल्या तयार होतात. एका टोपलीचे ३० ते ५० रुपये मिळतात. त्यात सातजणांना काय खाऊ घालायचे, या विवंचनेत त्यांची अनेक वर्षे सरली आहेत.

नवरात्रौत्सवादरम्यान घट बसवण्यासाठी लागणार्‍या टोपल्या बनवून विकणार्‍या या समाजातील अनेकांचे महिन्याभरापूर्वी ठाण्यात आगमन झाले आहे. त्यातील एक कुटुंब म्हणजे सोनोने कुटुंब. या कुटुंबातील 72 वर्षांच्या सीताबाई सोनोने आजही तितक्याच ताकदीने टोपल्या विणताना पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. ठाण्यातील जवाहरबाग परिसरात बांबूचे तात्पुरते तंबू उभारून यांच्या कामास सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

कडक, लांबच्या लांब, कोणतेही रंगरूप नसणार्‍या बांबूपासून सुबक, रेखीव टोपल्या आजही सीताबाई अगदी सहजतेने विणत आहेत. बांबूंपासून टोपल्या बनवण्याच्या या प्रक्रियेला संपूर्ण दिवस जातो. तेव्हा कुठे एक टोपली बनते. एका टोपलीची किंमत उणेपुरे 30 ते 50 रुपये. तरीही या आजीबाई त्यांना जेव्हापासून कळायला लागले आहे. तेव्हापासून टोपल्या विणत असल्याचे सांगतात.

मुळगाव जळगाव जिह्यातील रावे असले तरी संपूर्ण संसार घेऊन महाराष्ट्रभर फिरतात. जिथे जिथे अशा पद्धतीचे उत्सव, जत्रा असतील तिथे जाऊन टोपल्या तयार करून विक्री करतात. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पैसे कमावण्यासाठी कायम घराबाहेर. गाव, जिल्हा सार्‍याच सीमा पार करून कुटुंबासहीत भ्रमंती. हल्ली काही मुलं शिकायला लागली असल्याने ती येण्याचे टाळतात. तरीही या वर्षी मात्र सोनोने यांचे संपूर्ण कुटुंबच ठाण्यात आले आहे.

- Advertisement -

आजी, आजोबा, वडील, आई आणि मुले अशी सातजण ठाण्यात येऊन जास्तीत जास्त टोपल्या विणून त्यातून पैसा उभा करीत आहेत. सोनोने कुटुंबामधील तिसर्‍या पिढीतील अनिलने शाळा सोडून दिली. तर योगेश शाळेत जात आहे. मात्र आता एक महिन्यासाठी शाळा सोडून तोही कुटुंबासोबत येऊन हातभार लावत आहे. फक्त परंपरागत कलेची शिदोरी आणि त्यावर आपला उदरनिर्वाह येवढेच गणित या कुटुंबाला माहीत आहे.

आम्ही जळगावच्या पुढे रावे गावातून देवीच्या उत्सवाआधी 15 दिवस ठाण्यात येतो. टोपल्या बनवतो, पण मोबदला खूपच कमी मिळतो. काहीजण आहे त्याच किमतीत टोपली खरेदी करतात. मात्र काहीजण फारच घासाघीस करतात. बाजाराच्या बाजूला तेव्हा दवाखाना होता, त्याच्या आडोशाला बसून आम्ही आमची कामे करायचो. सावली मिळायची. आता आम्हाला तशी जागा नाही. भर उन्हात तापत बसावे लागते. मायबाप सरकारने आम्हाला यासाठी एखादी जागा द्यावी. आम्हाला दुसरी कोणती कामे येत नाहीत. याच कामावर आमचा संसार टिकून आहे.
– दिवालाल सोनोने, सीताबाईंचा नातू.

जेव्हापासून कळायला लागलंय तेव्हापासून हेच जीवन जगत आहे. दरवर्षी मी इथे येते, आमच्या कारभारीसोबत टोपली विणायची. इकडची जत्रा झाली की नंतर दुसर्‍या गावात. बांबूच्या वस्तू बनवायच्या आणि त्या विकायच्या हीच आमची कामे. आता दुसरे काय येतंय. आता पोरं आणि नातवंडे पण हीच कामे करतात.
– सीताबाई सुखदेव सोनोने .

सुबोध शाक्यरत्न ।

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -