घरमहाराष्ट्रवरुणराजा, कधी रे येशील तू...

वरुणराजा, कधी रे येशील तू…

Subscribe

पेणमधील शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावलेली असताना एरव्ही कोकणावर खूश असणारा पाऊस यावेळी नाराज आहे की काय, अशी चर्चा शेतकर्‍यांत सुरू आहे. जून महिना आता संपत आला तरी मान्सून सक्रीय झाला नसल्याने कडक उन्हामुळे भाताची उगवलेली रोपे करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसला आहे.

तालुक्यातील खारभूमी क्षेत्र, तसेच इतर क्षेत्रातील भाताची रोपे उगवली असली तरी पावसा अभावी समस्या गंभीर बनली आहे. मान्सून लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पेण तालुक्यात लागोपाठ तीन-चार दिवस पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने धूळ पेरणी केलेले भाताचे बियाणे रूजून छोटी रोपे उगवली आहेत. मात्र पाऊस गायब झाल्याने कडक उन्हाचा सामना या रोपांना करावा लागत आहे. सध्या अधूमधून एखादी पावसाची सर कोसळते त्या आधारावर ही रोपे तग धरुन आहेत.

- Advertisement -

येत्या दोन-तीन दिवसात पाऊस सुरू न झाल्यास परस्थिती गंभीर होऊन शेतकर्‍यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यात सुमारे 13 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी केली आहे व या ठिकाणी चांगली रोपे उगवली आहेत. मात्र या रोपांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. रोपांना आता खताची मात्रा देण्याची वेळ आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकरी रोपांना खताची मात्रा देऊ शकत नाही. त्यामुळे रोपांची वाढ खुंटली आहे. परिणामी लावणीचा हंगाम पुढे जाणार असल्याने भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -