घरदेश-विदेशझटका! धनंजय मुंडे, योगी आदित्यनाथ आणि टीम इंडियाला

झटका! धनंजय मुंडे, योगी आदित्यनाथ आणि टीम इंडियाला

Subscribe

धनंजय मुंडेंसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा

हायकोर्टाचे सरकारला निर्देश

शासनाच्या इनामी जमिनीची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचे सकृतदर्शनी निष्पन्न होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसह चौदाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिले आहेत. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस गावातील सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती.

- Advertisement -

तीच २४ एकर जमीन विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी १९९१ साली पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली, असा आरोप करीत राजाभाऊ फड यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. खरतर कुठल्याही इनामी जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही मात्र येथे दबाव आणून खरेदी व्यवहार केल्याचे याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी म्हटल आहे. याशिवाय कृषी जमीन असताना देखील अकृषिक करून घेतल्याचे देखील या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र तपासी अंमलदारांनी यात कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

या याचिकेवरील सुनावणी सोमवारी न्या. ता.वि. नलावडे आणि न्या. के.के. सोनवणे यांच्या खंडपीठापुढे झाली. त्यावेळी सकृतदर्शनी धनंजय मुंडे यांच्यासह चौदाजण दोष असल्याचे दिसून येत असल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

- Advertisement -

मात्र, १९९१ साली सदर जमीन देशमुख यांच्याकडून कायदेशीर मार्गाने विकत घेतली आहे. त्यावेळी रेकॉर्डवर ही जमीन शासनाची किंवा न्यासाची असल्याची कुठलीही नोंद नव्हती. उच्च न्यायालयाच्या वरील आदेशाविरुद्ध हस्तक्षेप धनंजय मुंडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांचे वकील सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांनी सांगीतले.

फड यांच्याकडून सुडबुद्धीने कोर्टाची दिशाभूल -मुंडे

अंबाजोगाई येथील जगमित्र शुगर मिल्स यासाठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमीन कोणाचीही फसवणूक करून खरेदीखत करून घेतली नाही. मात्र शेतकर्‍यांना व बँकांना ५४०० कोटी रुपयांना बुडवणार्‍या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावून धरल्यामुळे त्यांचे जावई असलेल्या राजाभाऊ फड यांच्याकडून सूडबुद्धीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरुद्ध खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

योगींविरोधात पोस्ट टाकणार्‍या पत्रकाराच्या सुटकेचे आदेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे पत्रकार प्रशांत कनौजिया यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांच्या सुटकेचे आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिले आहेत. कनौजिया यांना अटक म्हणजे त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचे हनन आहे. अशाप्रकारे एखाद्या नागरिकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश पोलिसांना फटकारले आहे.

नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांनी ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये एक महिला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिसत आहे. यामध्ये ती म्हणते की, ‘मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे.’

प्रशांत कनौजिया यांनी हा व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत शुक्रवारी रात्री लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हजरतगंज पोलिसांनी दिल्लीतून प्रशांत कनौजिया यांना कोणत्याही वॉरंटशिवाय अटक करण्यात आली होती.

या अटकेप्रकरणी प्रशांत कनौजिया यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. अटकेप्रकरणी प्रशांत कनोजिया यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. ही कारवाई कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आली असा सवाल कोर्टाने केला. सुप्रीम कोर्टाने कनोजिया यांच्या तात्काळ सुटकेचे आदेश देत खटला सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट केले. प्रशांत कनोजिया यांनी सोशल मीडियावर जे शेअर केले ते नव्हते करायला हवे असे म्हणू शकतो. मात्र, त्यांना अटक करण्याची गरज नव्हती, असेही कोर्टाने म्हटले.

दुखापतीमुळे शिखर धवन वर्ल्डकपमधून आऊट?

लंडन वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने या स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती. मात्र, टीम इंडियाच्या या प्रगतीला खीळ बसण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणारा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला. डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या या दुखापतीमुळे त्याला किमान तीन आठवडे मैदानाबाहेर रहावे लागण्याची शक्यता आहे. या दुखापतीमुळे त्याला उर्वरित विश्वचषकाला मुकावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण संघ व्यवस्थापनाने त्याला इंग्लंडमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धवन आणि रोहित शर्मा ही सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम सलामीची जोडी म्हणून ओळखली जात असल्याने भारताला धवनची उणीव नक्कीच जाणवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -